वलसाड | 23 सप्टेंबर 2023 : गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातून खूप मोठी बातमी समोर आली आहे. तिरुचिरापल्ली रेल्वे स्थानक आणि श्री गंगानगर रेल्वे स्थानक दरम्यान हमसफर एक्सप्रेसला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर ट्रेनमधून धुरांचे मोठे लोळ बाहेर पडू लागले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ट्रेनच्या जनरेटर कोचमध्ये ही आग लागली. त्यानंतर ही आग आख्या रेल्वेच्या डब्ब्यात धुमसली. त्यानंतर या रेल्वे डब्ब्याच्या बाजूला असणाऱ्या डब्ब्यांमधील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. घटनास्थळी पोलीस, सुरक्षा पथक पोहोचलं आहे. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
#WATCH | Fire breaks out in Humsafar Express, which runs between Tiruchirappalli and Shri Ganganagar, in Gujarat’s Valsad; no casualty reported till now pic.twitter.com/p5Eyb7VQKw
— ANI (@ANI) September 23, 2023
ट्रेनला आग लागल्यानंतर स्थानिकांनी या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केलाय. संबंधित व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आगाची नेमकी घटना का घडली? ट्रेन प्रवासासाठी निघाली तेव्हा सुरक्षेची काळजी घेतली गेली नव्हती का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. ही आग दुसऱ्या प्रवाशी डब्ब्यांमध्ये धुमसली असती तर मोठा अनर्थ घडला असता. पण सुदैवाने प्रवासी सुखरुप आहेत.
पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमीत ठाकूर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. आग लागलेल्या डब्ब्याला ट्रेनपासून दूर केलं जाईल. त्यानंतर लगेच हमसफर एक्सप्रेसला तिच्या नियोजित मार्गाला रवाना केलं जाईल. सध्या तरी आग आटोक्यात आणण्याचं काम सुरु आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
याआधी गेल्या महिन्यात तामिळनाडूच्या मदुरै रेल्वे स्थानकावर रामेश्वरला जाणाऱ्या रेल्वे गाडीला आग लागली होती. लखनऊ येथून रामेश्वरला जाणाऱ्या भारत पर्यटक ट्रेनला 26 ऑगस्टला आग लागली होती. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आता गुजराच्या वलसाड जिल्ह्यात रेल्वेला आग लागल्याची घटना घडलीय.