मुंबई : मुंबईच्या माझगाव येथील जीएसटी भवनला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शर्थीने सुरु आहे (fire broken out in GST Bhavan). आगीमुळे धुराचे मोठे लोळ परिसरात पसरले आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही आग लेव्हल-3 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जीएसटी भवनच्या बाजूला अनेक सरकारी कार्यालये आहेत. आग आटोक्यात यावी यासाठी प्रचंड प्रयत्न सुरु आहेत. ही आग जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जीएसटी भवनात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आहेत. आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती वर्तवली जात आहे. इमारतीत फर्निचर आणि लाकडी सामानही भरपूर असल्यामुळे आग वाढत आहे (fire broken out in GST Bhavan). दरम्यान, जीएसटी भवनात कुणीही अडकले नसल्याची माहिती मिळत आहे.
Mumbai: A level III fire has broken out in GST Bhavan, in Mazgaon area. More details awaited. pic.twitter.com/92fqpMF3tt
— ANI (@ANI) February 17, 2020
‘मी बैठकीत असताना अधिकाऱ्यांचा फोन आला आणि मी तातडीने येथे दाखल झालो’
“मी बैठकीत असताना अधिकाऱ्यांचा फोन आला आणि मी तातडीने येथे दाखल झालो. निघण्यापूर्वी मी आयुक्तांना फोन केला आणि माहिती दिली. नंतर मी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना फोन केला. नागरिकांची येण्या-जाण्याची व्यवस्था करा असं सांगितलं. कुणी जखमी झाल्याची माहिती अजूनपर्यंत आलेली नाही”, असे अजित पवार म्हणाले.
“इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरु होतं. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग नियंत्रणात आल्यानंतर आगीमागील कारणं काय होती त्याची शाहनिशा अग्निशमन दल करेल”, असे अजित पवार यांनी सांगितलं.
“किती नुकसान झालं त्याची माहिती घेतली जाईल. मी अधिकाऱ्यांना विचारले त्यांनी माहिती दिली की सर्व डेटा आपल्याकडे आहे. सर्व डाटा कॉम्प्युटराईज आहे आणि मला माहिती देण्यात आली की, सर्व सुरक्षित आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
“अशा घटना घडता कामा नये. आपण मंत्रालयाला आग लागली होती तेव्हा सूचना दिली होती की, सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीत करुन घ्या. यासंदर्भात तपास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल”, असं अजित पवार म्हणाले.