मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. पवार यांच्या राजीनाम्याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार? असा सवालही केला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीत उद्या फायनल निर्णय होणार आहे. तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे. त्यांचा निर्णय होऊ द्या. मग बोलेन, असं सांगतानाच मी शरद पवार यांना सल्ला कसा देणार? आणि माझा सल्ला पचनी पडेल काय? असं विधानही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले होते. ही सदिच्छा भेट होती. या भेटीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यासह कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवर भाष्य केलं. शरद पवारांशी माझं बोलणं झालं नाही. त्यांना मनाप्रमाणे काही करण्याचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांचाही त्यांच्यावर अधिकार आहे. ते सर्वांच्या हितााच निर्णय घेतील. मी त्यांना सल्ला कसा देणार? मी दिलेला सल्ला पचना नाही पडला तर कसं होईल? असं सांगतानाच उद्या 5 वाजेपर्यंत त्यांचा निर्णय होणार आहे. त्यानंतरच मी त्याबाबत बोलेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन करण्याचा अधिकार असतो. परंतु शरद पवार यांचा निर्णय अजून झालेला नाही. तो आल्यावर मी बोलेन. महाविकास आघाडीला तडा जाईल असं काही राष्ट्रवादीत घडेल असं वाटत नाही. तसेच या विषयावर मी अधिक बोलणार नाही. महाविकास आघाडीला तडा जाईन असं मी काही करणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय बजरंग बली म्हणून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बऱ्याच वर्षापूर्वी शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला होता. हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार काढला होता. आता मोदींनी बजरंगबली की जय म्हणून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कायद्यात बदल केला का?, असा सवाल त्यांन आहे.
मोदी जर जय बजरंग बली म्हणून मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. तर तुम्हीही जय भवानी, जय शिवाजी म्हणून मतदान करा. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात तुम्हाला काही अडचण आली तर जय भवानी, जय शिवाजी म्हणा. तुमची एकजूट दाखवा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं.