मुंबई : संयुक्त महाराष्ट्र आंदोलन असो किंवा महात्मा गांधीची सभा, प्रत्येक सभा आणि आंदोलनाचे साक्षीदार असलेले कुर्ला पश्चिम येथील गांधी मैदान अखेर पालिकेच्या ताब्यात आले आहे. येथील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे भुईसपाट केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने ऐतिहासिक गांधी मैदानाचा पालिकेकडे ताबा दिला आहे. (Gandhi Maidan in Kurla is finally in the possession of BMC)
मागील कित्येक वर्षांपासून गांधी मैदान वाचविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक दि. मा. प्रभुदेसाई आणि सर्व कुर्ल्यातील कार्यकर्ते विविध मार्गाने संघर्ष करत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अतिक्रमण काढल्यानंतर परत बांधकामे होत असल्याने हा प्रश्न गंभीर बनला चालला होता. अखेर सर्वसंमतीने 2505 चौरस मीटर गांधी मैदानाची शासकीय जमीन सहाय्यक आयुक्त अलका ससाणे, सहाय्यक अभियंता देशमुख, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, परिरक्षण भूमापक एस. व्ही. श्रावणे, तलाठी एन एस भांगरे, अव्वल कारकून एस. बी. मोरे, अजय शुक्ला, संजय घोणे, विश्वास कांबळे यांच्या उपस्थितीत पालिकेने ताबा घेतला आहे. मंगळवारी कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांनी अतिक्रमण निष्कासन दरम्यान घेतलेल्या खबरदारीमुळे सुरळीत कारवाई पार झाली.
अनिल गलगली यांनी सहाय्यक आयुक्त अलका ससाणे, उपजिल्हाधिकारी संदीप थोरात आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांचे आभार मानत सांगितले की अण्णा प्रभुदेसाई, भास्कर सावंत सोबत सर्व अण्णा टीमला श्रेय दिले असून आता पालिकेची जबाबदारी वाढली आहे. या मैदानाचे सुशोभीकरण आणि अन्य कामांसाठी आमदार संजय पोतनीस यांनी संमती दर्शविली आहे. सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी आश्वासन दिले आहे की, आता एकही इंच जमिनीवर अतिक्रमण होणार नाही आणि लवकरच वास्तुविशारदाची नेमणूक करत एक आराखडा बनवला जाईल जेणेकरुन ऐतिहासिक गांधी मैदान लोकोपयोगी बनेल.
या आंदोलनात उमेश गायकवाड, डिंपल छेडा, संतोष देवरे,गणेश नखाते, राजेंद्र शितोळे, मंगला नायकवडी, निलाधर सकपाळ, राजेश भोजने, बंडु मोरे, अॅड अमित सरगर,अॅड प्रणिल गाढवे, आनंद शिंदे, अमित कांबळे, मोहन घोलप, रामचंद्र माने, कैलास पाटील, अविंद्र शिंदे, संतोष पांढरे यांनी वेळोवेळी भाग घेतला.
इतर बातम्या
(Gandhi Maidan in Kurla is finally in the possession of BMC)