सध्या मुंबईत गणेशोत्सवाची धूम आहे. खासकरुन लालबाग-परळ या भागात गणेशोत्सवाचा एक वेगळ उत्साह, लगबग दिसून येते. लालबाग-परळ भागात अनेक प्रसिद्ध गणेश मंडळं आहेत. लालबागमध्ये तर या गणेशोत्सवाच्या दहा दिवसात लाखो भाविक येतात. ‘लालबागचा राजा’ आणि लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशगल्ली ‘मुंबईचा राजा’ ही मुंबईतील दोन प्रसिद्ध गणेश मंडळं आहेत. लालबागमध्ये अजूनही एक मंडळ आहे, जे या दोन मंडळांपेक्षा जुनं आहे. सध्या या मंडळाच 99 व वर्ष असून शतकमहोत्सवाकडे त्यांची वाटचाल सुरु आहे.
लालबाग खटाव बिल्डिंगमल्या गणेशोत्सवाच यंदाच 99 व वर्ष आहे. लालबाग इन्कम टॅक्स समोर ही इमारत आहे. शंभरहून अधिक वर्षापूर्वीच्या या बिल्डिंगमध्ये 126 रहिवाशी राहतात. चौथ्या मजल्यावरील मोकळ्या गँलरीत हा गणपती 99 वर्षापासून बसवण्यात येतोय. 1926 साली लक्ष्मण विंझे यांनी शिसवी सागाच्या लाकडाचा साडेतीन फुटाचा मखर दिला. सध्या नवीन पिढीकडून संगमरवळी मखरात गणपती बसवण्यात येतो.
परंपरेच पालन
लालबागमधील सर्वच मंडळ उत्सवाची परंपरा जपताना सामाजिक उपक्रमातदेखील तितकीच सक्रीय असतात. लालबाग खटाव बिल्डिंगमल्या गणेशोत्सव मंडळ सुद्धा याच परंपरेच पालन करतं. संकटकाळात लोकांना मदतीचा हात देणं तसच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात मंडळ आघाडीवर आहे. तरुण आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची उत्तम वाटचाल सुरु आहे.
मंडळाचा श्रीमंत इतिहास
या गणेशोत्सवाला कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज, प्र. के. अत्रे, ना.ग.गोरे, रत्नाप्पा कुंभार आदि मान्यवरांनी भेट दिली आहे. मंडळाचे जुने कार्यकर्ते शांताराम करावडे यांनी अमृत महोत्सवी वर्षात ही माहिती दिली होती. दाजीबा कामत, दाजी लाड, श्रीधर नलावडे, केशवराव बाबळे, प्रभाकर चव्हाण व अन्य जूनी मंडळी आज नाहीत.
अखंडपणे 99 वर्षाची परंपरा
सध्याची तरूणपिढी केवळ परंपरा म्हणून नाही. तर रहिवाश्यांच्या सर्वांगीण विकासाची उदात्त कल्पना मनात बाळगून, राष्ट्राची एकता व बंधूभाव जोपासणारा आणि राष्ट्रीयत्वाचे अखंड प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाची परंपरा जपत आहे. अखंडपणे 99 वर्ष, अडीज फूट गणेशाच्या मूर्तीमध्ये आजपर्यत फरक करण्यात आला नाही. गणेश चतुर्थी ते गौरीविसर्जन या कालावधीत कित्येक वर्षाच्या परंपरेला जपत, काळानुरूप त्यात बदल घडवून शतक महोत्सवाकडे मंडळ वाटचाल करीत आहेत.