मुंबई : महाराष्ट्रात सर्वांना प्रिय असलेला सण गणेशोत्सव येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. गणेशोत्सवाचे 10 दिवस मुंबईसह राज्यात मोठा उत्साह असतो. यंदा अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबरला येत आहे. त्याचदिवशी मुस्लिम बांधवांची ईद मिलाद-उल-नबी आहे. हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी 28 सप्टेंबरचा दिवस महत्त्वाचा आहे. गणेश चतुर्थीपासून मनोभावे गणपती बाप्पाची पूजा, आराधना केली जाते. 10 व्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका निघतात. मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरतात. मुंबईसह प्रमुख शहरात विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह असतो. मोठी गर्दी रस्त्यावर असते. हीच बाब लक्षात घेऊन मुंबई आणि पुण्यातील मुस्लिम समुदायाने ईद मिलाद-उल-नबीच सेलिब्रेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्याच्या सीरत समितीने मुस्लिमांना 1 ऑक्टोबरला आणि मुंबईतील मुस्लिमांना 29 सप्टेंबरला ईद मिलाद-उल-नबी साजरी करण्यास सांगितली आहे. धार्मिक सहिष्णुता आणि सलोख्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे. पुण्याच्या सीरत समितीचे मौलाना गुलाम अहमद खान कादरी यांनी सांगितलं की, “गणेश उत्सव हा आमच्या हिंदू बंधुंचा सण आहे. 10 दिवस हा उत्सव असतो. शेवटच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुका निघतात. त्यामुळे ईद मिलाद-उल-नबीची मिरवणूक 28 सप्टेंबरऐवजी 1 ऑक्टोबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे” ‘आवाज द व्हॉइस’ने हे वृत्त दिलं आहे.
ईद मिलाद-उल-नबी 28 सप्टेंबरलाच
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. यावर्षी 19 सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरुवात होणार असून 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. यादिवशी गणेश मुर्तीच विसर्जन केलं जातं. ईद मिलाद-उल-नबी यावर्षी 28 सप्टेंबरलाच आली आहे. त्यामुळे सीरत समिती पुणे यांनी आपणहून पुढाकार घेत काही बदल केले आहेत.