सुनील जाधव, Tv9 मराठी, मुंबई | 11 डिसेंबर 2023 : आपण अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टींना आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक मानतो. पण यापैकी महत्त्वाच्या असलेल्या अन्नामध्ये कांदा आणि लसूण हे देखील तितकेच अविभाज्य घटक. कांदा किंवा लसूण खाद्यपदार्थात नसले तर अनेकांच्या जीभेला चव लागत नाही हे वास्तव आहे. प्रत्येक घराघरात, हॉटेलमध्ये कांदा आणि लसूण असणार नाही असं अपवादात्मक परिस्थितीत बघायला मिळेल. त्यामुळे कांदा आणि लसूण नेहमीच डिमांडवर असतात. पण कांदा आणि लसूण यांच्याबाबत आलेल्या एका बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कांद्याने आतापर्यंत सर्वसामान्यांना भाववाडीतून सातत्याने रडवलं हे वास्तव आहे. त्यानंतर आता लसूण देखील रुसून बसणार आहे. बाजारात आता लसणाचे भावदेखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक, महिला वर्ग नाराजी व्यक्त करण्याची दाट शक्यता आहे.
कांद्यापाठोपाठ आता लसूणही महागला आहे. प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडल्याने पिकांच्या खराब उत्पादनामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यपासून 200 ते 250 रुपये किलो असलेला लसूण आता 350 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दादर बाजारपेठेत लसणाचे दर वाढल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
अनेक हॉटेल आणि घरांमध्ये लसणाची चटणी आणि लसणाचे पदार्थ मेनूमधून काढून टाकण्यात येत आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन पीक बाजारात येण्यास वेळ लागेल आणि तोपर्यंत भाव चढेच राहण्याची शक्यता आहे.
दादर मार्केट पाठोपाठ नवी मुंबईच्याही बाजारात लसण्याच्या दरात वाढ झाली आहे. लसणाची आवक घटल्याने भावात वाढ झाल्याचं तिथेही बोललं जात आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने, लसणाच्या भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. या आठवड्यात लसणाच्या भावाने आणखी उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात चांगल्या दर्जाचा लसूण 350 रुपये किलोपर्यंत गेला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाचा भाव प्रतिकिलो 400 ते 410 रुपये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात लसणाचा दर किलोमागे 120 ते 140 रुपये इतका होता. पण आता हाच दर 400 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात लातूरमध्ये लसूण प्रति क्विंटल 11 हजार रुपये किंमतीने भाव खात असल्याने भाजी मंडईत येता येता लसूण 120 ते 140 रुपये प्रति किलो झाला होता. ऐन दिवाळीत लसूण महागल्याने सामान्यांना थोडी महागाई सोसावी लागली होती. दिवाळीच्या निमित्ताने गुजरात आणि मध्यप्रदेशमधून लातुरच्या बाजारात लसूण विक्रीला आला होता. आठवड्याला किमान 100 क्विंटल लसूण बाजारात आणला गेला होता.