मुंबई | 24 सप्टेंबर 2023 : सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून तिची ओळख आहे. तिच्या कार्यक्रमाला गर्दीचा उच्चांक असतो. प्रत्येक कार्यक्रमागणिक तिच तिच्या कार्यक्रमांच्या गर्दीचा उच्चांक मोडत असते. आज ती यशाच्या शिखरावर आहे. तिचा एक सिनेमाही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. म्हणजे ती आता सिनेमातही आली आहे. तिच्याकडे पैसा आहे आणि सुखही आहे. पण इथपर्यंत झालेला तिचा प्रवास फार सोपा नव्हता. अनेक कष्ट घ्यावे लागलेत. तिला आणि तिच्या आईला खूप हाल सहन करावे लागले, तेव्हा कुठे ती यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली. तेही वडिलांची काडीचीही साथ नसताना. किंबहुना तिला वडिलांचा सहवासच लाभला नाही. असं काय घडलं? काय सांगितलं गौतमीने?
प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यावर प्रकाश टाकला. तिचं बालपण, तिचा संघर्ष आणि तिच्या डान्सच्या आवडीवरही ती भरभरून बोलली. यावेळी ती कधी रडली तर कधी दिलखुलास हसली. वडिलांच्या गावचं काहीच माहीत नाही. जळगाव जिल्ह्यातील चोपडा हे वडिलांचं गाव. पण चोपड्याशी माझा कधीच संबंध आला नाही. सर्व बालपण आईच्या माहेरी सिंदखेड्यात गेलं. तिथेच वाढले. तिथेच शिकले, असं गौतमी पाटील यांनी सांगितलं.
माझं दहावी पर्यंत शिक्षण झालं. आठवीपर्यंत सिंदखेड्यात होते. दहावीला मी पुण्यात आले. माझं कुटुंब म्हणजे आई आणि मीच. सोबत आईचे वडील म्हणजे माझे आजोबा. मी आठवीला गेले तेव्हा पहिल्यांदाच वडिलांना पाहिलं. त्याला कारणही घडलं. आईच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी आम्हाला सांभाळलं होतं. मी आठवी झाले. त्यानंतर मला पुण्याला शिकायला जायचं होतं. आजोबांचं वय झालं होतं. तेव्हा आम्हाला कोण सांभाळणार? असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा वडिलांना बोलवायचं ठरलं आणि मग आयुष्यात पहिल्यांदाच मी वडिलांना भेटले, असं तिने सांगितलं.
वडिलांना भेटण्याचा किस्साही अजब होता. तो सांगताना गौतमी भावूक झाली होती. जेव्हा वडील आले तेव्हा आम्हाला समोरासमोर उभं केलं. आणि मला विचारलं हे कोण आहेत? तेव्हा मी सांगितलं, मी त्यांना ओळखत नाही. तेव्हा ते माझे वडील असल्याचं मला सांगण्यात आलं. वडिलांनीही मला कधीच पाहिलं नव्हतं. त्यांनी कधी फोन केला नव्हता. तेही मला पहिल्यांदाच भेटत होते. त्यामुळे त्यांनीही मला ओळखलं नाही, असं ती म्हणाली.
शाळेत असताना फार अभ्यास करत नव्हते असं तिने सांगितलं. डान्सचं लहानपणापासून वेड होतं. गॅदरिंग असेल तर मी सर्वात पुढे असायचे. शाळेत असताना चला जेजुरीला जाऊ या गाण्यावर पहिल्यांदा ग्रुप डान्स केला. तेव्हा मी सहावी-सातवी होते. त्यानंतर अकलूजला पहिला जाहीर कार्यक्रम झाला. महेंद्र सरांकडे मी डान्स शिकले. लावणी त्यांनीच शिकवली. त्यांनीच आम्हाला अकलूजला नेलं होतं. तिथे आमच्या पथकाचा कार्यक्रम झाला. तोही ग्रुप डान्स होता. त्यावेळी आम्हाला बक्षीसही मिळालं होतं, असंही तिने सांगितलं.
सहा वर्षापूर्वी वाघुरीला माझा एकटीचाच कार्यक्रम झाला. इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर एकटीचा पहिल्यांदा कार्यक्रम झाला. त्यावेळी खूप भीती वाटली होती. पण कार्यक्रम चांगला झाला. त्यानंतर मला खूप कार्यक्रम मिळायला लागले. त्यानंतर मी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही, असंही तिने स्पष्ट केलं.