घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या तब्बल चौथ्या दिवशी मदत आणि बचावकार्य पूर्ण झाले. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबई विमानतळावर एअर ट्राफिकचे माजी कंट्रोलचे जनरल मॅनजर मनोज चंसोरिया (वय ६०) यांचा समावेश आहे. तब्बल ५५ तासांनी त्यांचा मृतदेह काढण्यात आला आहे. मनोज चंसोरिया पत्नी अनितासह जबलपूरवरुन मुंबईत आले होते. त्यांना व्हिसासंदर्भात काम होते. पती- पत्नी दोन्ही जण काम संपवून सोमवारीच पुन्हा जबलपूरला जाणार होते. त्यावेळी घटकोपर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. परंतु तो त्यांचा शेवटचा दिवस ठरला. त्यावेळी आलेल्या वादळामुळे पेट्रोल पंपावर असलेले भलेमोठे होर्डिंग कोसळले. त्यात त्यांची कार दाबली गेली. या दुर्घटनेत दोन्ही पती, पत्नीचा मृत्यू झाला.
मनोज चंसोरिया हे मुंबईच्या विमानतळावर एअर ट्राफिकमध्ये जनरल मॅनजर काम करत होते. यावर्षी मार्च महिन्यात ते निवृत्त झाले. त्यांचा एकमेव मुलगा अमेरिकेत राहतो. तो अमेरिकेतून वडिलांना फोन करत होता. परंतु ते फोन उचलत नव्हते. मुलाने तक्रार केल्यावर त्यांचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी तपासले असता घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर दाखवले. मनोजचा मोबाईल ढिगाऱ्याखालून पोलिसांना मिळाला. मात्र मनोज आणि त्यांची पत्नी यांची गाडी ढिगाऱ्याखालीच होती.
मनोज चंसोरिया डिगाऱ्याखाली दाबले गेले होते. त्यानंतर त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले. सर्व जण ढिगारे काढण्याची वाट पाहत होते. अखेर बुधवारी रात्री १२ वाजता मनोज आणि त्यांची पत्नी अनिता यांचा मृतदेह निघाला. त्यांच्या लाल गाडीच्या खाली ते दोघे दाबले गेले होते.
होर्डिंगचे प्रचंड वजन होते. परंतु गॅस कटरशिवाय ते काढता येणे शक्य नव्हते. त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे गॅस कटरचा वापर करणे धोकादायक होते. गॅस कटरचा वापर न केल्यामुळे ढिगारे काढण्यास उशीर झाला. अखेर ५५ तासांनी मनोज चंसोरिया यांचा मृतदेह निघाला. आता या ठिकाणी बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.