मुंबई : एखाद्या भयंकर घटनेचे कधी, कुठे आणि कसे पडसाद उमटतील, हे सांगता येत नाही. आपली लहान मुलगी सुरक्षित राहावी म्हणून फुटपाथवर राहणाऱ्या एका मातेने तिच्याच मुलीला साखळदंडात बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना सायन परिसरात उघडकीस आलीय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माहीम परिसरात एका पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन बलात्कार करण्यात आला होता आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्यासुद्धा झाली होती. असा प्रकार आपल्या मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून या मातेने हे पाऊल उचलले आहे.
आपल्या 7 वर्षांच्या चिमुरडीला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या मुलीच्या आईचे सपना कौर असे नाव आहे. या महिलेवर नेटिझन्सने कॉमेंट्सही केल्या होत्या. अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली होती. मात्र, तिने मुलीला का बांधून ठेवलं होतं? याचं कारण समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ‘आपल्या मुलीवर कुणी बलात्कार करू नये, म्हणून मी तिला साखळीने बांधून ठेवलं होतं’, अशी स्पष्टोक्ती या महिलेने दिली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच काय करावं? हे सुचेनासं झालं.
सायनच्या पंजाब कॉलनीच्या फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून हे कुटुंब राहतंय. अनेक नराधम गर्दुल्यांचा भीतीने हे कुटुंब दिवस काढत होत. मात्र महिममधल्या त्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाऱ्याने या मातेचे काळीज हेलावून गेले आहे. महिममधली ती चिमुरडी देखील फुटपाथवर आपल्या आईडीलासोबत राहत होती त्यामुळे असा प्रकार आपल्या मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून या मातेने चक्क साखळदंड आपल्या मुलीला कोणिही घेऊन जाण्यापासून वाचवू शकतो असा मार्ग स्वीकारला.
या कुटुंबात 65 वर्षांची एक वृद्ध महिला, तिचा 40 वर्षांचा अपंग मुलगा, पतीने सोडून दिलेली 25 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांची नात असे सदस्य आहेत. या साखळदंडाची चावी आजी आणि आईकडे असते. तिला काही वेळ रिकामी देखील केलं जातं, मात्र पुन्हा तिच्या पायात बेड्या पडतात. ही चिमुरडी थोडी खोडकर आहे म्हणून ती नजरेसमोरून कुठेही जाऊ नये यासाही ही खबरदारी घेण्यात आलीय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी आणि पोलिसांनी तिथे धाव घेतली आणि मुलीला या कैदेतून मुक्त केलं मात्र या कैदेत ठेवण्याचे कारण मुलीच्या आईच्या तोंडून ऐकून सगळेच आवाक् झालेत.