मुंबई : सोमवारपर्यंत कामावर या, नाही तर मंगळवारपासून मेस्माची कारवाई सुरू होईल, असा शब्दात शेवटचं अल्टिमेटम परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलं आणि इकडे 17 दिवसांआधी आझाद मैदानात संपाचं नेतृत्व करणाऱ्या गोपीचंद पडळकरां(Gopichand Padalkar)नी परबांवर हल्लाबोल केला. परबांची मेस्मा (mesma) लावण्याची भाषा मुघलशाही असल्याचा घणाघात परबांनी केलाय.
‘जमिनी हडपण्याचा डाव’
आठवड्यांआधी, पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी आझाद मैदानातल्या संपातून माघार घेतली. पगारवाढ मान्य करत, त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांनाही एक पाऊल मागे घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून पडळकर आणि खोतांनी एसटीच्या संपावरून भाष्य करणं टाळलं. मात्र आता पडळकरांच्या निशाण्यावर परब आलेत. ज्या प्रमाणं गिरणी कामगारांचा संप चिघळवला. त्याचप्रमाणं एसटीचा संप चिघळवून, महामंडळाच्या जमिनी हडपण्याचा डाव असल्याचा आरोप पडळकरांनी केलाय.
‘माघार नाही’
विलीनीकरणाशिवाय संप मागे नाही, अशी ठाम भूमिका घेत अजूनही तब्बल 70 हजार कर्मचारी संपात सहभागी आहेत तर मंत्री परब समितीच्या अहवालाकडे बोट दाखवतायत. त्यामुळे मंगळवारपासून जर कारवाई सुरू झालीच, तर पुन्हा पडळकर मैदानात उतरू शकतात, हेच सध्या त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही याविषयावरून अनिल परब यांच्यावर टीका केली.