मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांची उपोषणादरम्यान आज प्रकृती बिघडली. पण ते उपोषणावर ठाम आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने काल मनोज जरांगे यांची जालन्यात जावून भेट घेतली. पण मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणावर आज चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणारा निर्णय घेण्यात आलाय.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता आज वितरित केला जाणार आहे. सरकारने प्रती क्विंटल साडेतीनशे रुपये शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आज 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 465 कोटींचं सानुग्रह अनुदान वितरित होणार आहे. काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज केल्याने त्यांना दुसरा हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आणखी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत चर्चा झाली. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकारी निघून गेल्यानंतर सर्व मंत्र्यांमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत कुणबी प्रमाणपत्राचा अहवाल पुढच्या आठ दिवसात येणार असल्याचं निश्चित झालंय. तसचे याबाबतची पुढची बैठक आता मराठवाड्यात होणार आहे.