गुजरात ATS कडून मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक, घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी

| Updated on: Feb 04, 2024 | 11:19 PM

इस्लाम अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरी यांना घाटकोपरमध्ये अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर अजहरी यांच्या समर्थकांनी घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली आहे.

गुजरात ATS कडून मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक, घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी
Follow us on

मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : गुजरात एटीएसच्या पथकाने मुस्लिम धर्मगुरू तथा इस्लाम अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरी यांना ताब्यात घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यात आणलं आहे. त्यांच्याविरुद्ध गुजरातमधील जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात पोलिसांनी मुफ्ती सलमान अजहरी यांना घाटकोपर भागातून ताब्यात घेतले आहे. मुफ्ती सलमान अजहरी यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समर्थक घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येत जमले आहेत. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने लोक जमून घोषणाबाजी करत आहेत. परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पोलीसही सतर्क झाले आहेत. परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसकडून आज दुपारी बाराच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना अजूनही घाटकोपर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. यावेळी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुफ्ती सलमान अजहरी यांचे समर्थक घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर रास्ता रोको करून घोषणाबाजी करत आहेत. त्यांच्या समर्थकांनी अफाट अशी गर्दी केली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरीलही दबाव वाढताना दिसतोय.

घोषणाबाजी करू नका आणि कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन घाटकोपर पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र मुफ्ती सलमान अजहरी यांचे समर्थक अजूनही येथे जमले आहेत. गुजरात एटीएसला मुफ्तींना गुजरातला न्यायचे आहे. मात्र लोकांची गर्दी पाहता त्यांना अजूनही पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुफ्ती सलमान अजहरी यांनी गुजरातच्या जुनागढ येथे 31 जानेवारी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या प्रक्षोभक भाषणावर भाजप नेते सुधांशी त्रिवेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित व्हिडीओची दखल पोलिसांकडून घेण्यात आली. याप्रकरणी जुनागडमध्ये सलमान अजहरी आणि कार्यक्रमाचं आयोजन करणारे आयोजक मोहम्मद युसुफ मलिक, अजीम हबीब ओडेदरा यांच्याविरोधात कलम 153 बी, 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आधी मलिक आणि हबीब या आयोजकांना अटक केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मुंबईच्या घाटकोपर येथून सलमान अजहर यांना अटक करण्यात आली आहे.