मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आधी सांगली जिल्ह्यातील काही गावांना कर्नाटकात येण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील काही गावात पाणी सोडून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. या पाण्यामुळे जत तालुक्यातील दुष्काळी गावांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सरकार काहीच करू शकत नाही. आम्ही ते करू शकतो, असं दाखवून जत तालुक्यातील गावांना महाराष्ट्रापासून तोडण्याची खेळी या मागे असतानाच महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र, हा शेजार धर्म आहे. त्यात काय एवढं? असा सवाल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पाणी सोडणे हा शेजारधर्म आहे. त्यात काय एवढे? कर्नाटक काही देशाबाहेर नाही. त्यांनी पाणी सोडले चांगले झाले. त्यांच्याकडे चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना करू, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. गुलाबराव पाटील यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना पुन्हा एकदा 5 कोटी रुपये देण्यात आले. त्यांनी फुटून बाहेर पडू नये म्हणून त्यांना ही रक्कम देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणी काही म्हणतंय. 5 कोटी घेतले असं म्हणतात. ही रक्कम मोजायला ते गुवाहाटीला गेले होते का ते सांगावं? सर्व आमदार श्रद्धेने कामाख्या देवीला गेले होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, कर्नाटक सरकारकडून सांगली जिल्ह्याच्या जतच्या तिकोंडी भागात पाणी सोडण्यात आले आहे. कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर पाणी योजना ओव्हरफ्लो करून दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडलं आहे. या दुष्काळी गावांना आधी कर्नाटकमध्ये येण्याचे निमंत्रण दिलं होतं, तर आता थेट दुष्काळी भागातल्या गावात पाणी सोडण्यात आलं आहे.
एका दिवसात तिकोंडी येथील साठवण तलाव कर्नाटकच्या सोडलेल्या पाण्यामुळे ओव्हरफ्लो झाला आहे. कर्नाटक सरकारच्या पाणी सोडण्याच्या निर्णयाचे 42 गावातील लोकांनी स्वागत केल असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं जात आहे.
सुरुवातीला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जतमधील 42 गावांवर दावा केला. त्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. जतच्या बेचाळीस गावातील ग्रामस्थ आक्रमकपणे उठले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं. पाणी द्या नाहीतर कर्नाटकात जातो, अशी भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली.
सरकारला आठ दिवसाचा अल्टीमेटम ही देण्यात आला. दरम्यान महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे निधी आणि जाहीर घोषणाबाजी करण्यात अडचणी आहेत.
मात्र तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुष्काळी भागातील शिष्टमंडळ भेटलं असून सकारात्मक तोडग्याचं आश्वासन, दुष्काळग्रस्तांना मिळालं आहे. दुसरीकडे महाराष्ट्र शास आणि जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आलं असून दुष्काळी भागात पाणी पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
मात्र याचवेळी कर्नाटक सरकारने तुबची बबलेश्वर या योजनेतून पाणी सोडून ते पाणी जतमधल्या गावांना पाणी देण्यात आलं आहे. सर्वच बाजूने महाराष्ट्राची कोंडी करण्याचा उद्योग कर्नाटकाकडून केला जात आहे.
कर्नाटकमधील तुबची बबलेश्वर या योजनेचे पाणी जत मधील 42 गावांना देण्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र कर्नाटक याबाबत पाऊल उचलताना दिसत नाही. मात्र जतमधील लोक आता आक्रमक झाल्यानंतर पाणी न मागता कर्नाटकने पाणी सोडून एक प्रकारे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं आहे.