मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोलनाके जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर जोरदार आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी पोलिसांची बाचाबाचीही झाली. मात्र, कुणी तरी टोल नाक्याची केबिन जाळल्याने वाद निर्माण झाला आहे. अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. टोलच्या या वादात आता प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच ललकारले आहे. राज ठाकरे तुमची दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा देतानाच राज यांना गंभीर इशाराही दिला आहे.
उद्योगमंत्री उदय सावंत यांची भेट घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना घाबरणार नाही. माझ्या नादी लागल्यास सर्वकाही बाहेर काढेन, असा इशाराच राज ठाकरे यांना दिला. राज ठाकरेंना सांगत आहे, तुमची जी पिल्लावळ फोनवर धमक्या देत आहेत ते काही उपटून XX XX शकत नाहीत. हे आव्हान आहे. कष्टकरी जनसंघ अशा विद्ध्वंसक गोष्टींना घाबरत नाही. प्रभू श्रीरामचंद्राचा विचार आणि नथुरामजी गोडसे यांच्या अखंड भारताचा विचार मांडणारी ही संघटना आहे. त्यामुळे खबरदार राज ठाकरे, तुमच्या पिल्लावळींना सांगा धमक्यांचे फोन करायचे नाही. परळ लालबागला राहतो. चॅलेंज स्वीकरतो. अशा फोनवर धमक्या देण्याऐवजी फ्रंट टू फ्रंट वन टू वन करायला तयार आहे, असा इशाराच गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
यावेळी गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या सहकार्यांनी राज ठाकरे तेरी दादागिरी नही चलेगी… नही चलेगी… अशा घोषणाही दिल्या. दरम्यान, सदावर्ते यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी टोलनाके जाळण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असं सदावर्ते यांचं म्हणणं आहे. कष्टकरी जनसंख्येची 154 सीआरपी खाली तक्रार आहे. त्यामुळे तातडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या या मागणीवर मनसे नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सदावर्ते काय बोलतात त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. सदावर्ते यांची प्रॅक्टिस बंद आहे. त्यामुळे ते असं करत आहेत. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्याकडे लक्ष देण्याचीही गरज नाही, असंही त्यांनी सांगितलं.
मनसे नेते अविनाश जाधव यांनीही सदावर्ते यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सदावर्ते वेडा माणूस आहे. त्याला उत्तर देणं मला योग्य वाटत नाही, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.