मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यांना जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर दोघांनाही पोलीस (police) कोर्टाच्या बाहेर घेऊन आले. दोघेही कोर्टाच्या बाहेर आले. तेव्हा दोघांचेही चेहरे पडले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव दिसत होता. काल पोलीस ठाण्यात जाताना राणा दाम्पत्यांकडून मीडियाच्या दिशेने हात उंचावून जोरजोरात घोषणा दिल्या जात होत्या. पण आज नवनीत राणा यांचा चेहरा पडला होता. मात्र, मीडियाने आवाज देताच दोघांनीही हात जोडले आणि निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही दोन वेगवेगळ्या व्हॅनमध्ये बसवून तुरुंगाच्या दिशेने घेऊन गेले.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना काल अटक करण्यात आल्यानंतर आज त्यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली तर रिजवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्यांची बाजू मांडली. तब्बल 25 मिनिटे कोर्टात युक्तिवाद झाला. त्यानंतर कोर्टाने या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर या दोघांनी तात्काळ वांद्रे कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. मात्र कोर्टाने येत्या 27 एप्रिल रोजी सरकारी वकिलांना जामिनावर लेखी निवेदन देण्यास सांगितलं. तसेच येत्या 29 एप्रिल रोजी या अर्जावर युक्तिवाद करण्यात येणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे राणा दाम्पत्यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे.
राणा दाम्पत्याला जामीन नाकारल्यानंतर त्यांना घेऊन पोलीस कोर्टाच्या बाहेर आले. तेव्हा नवनीत राणा यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसत होता. रवी राणा हे सुद्धा तणावात दिसत होते. दोघांनीही आधी मीडियाकडे पाहिले नाही. मात्र, पत्रकारांनी आवाज देताच रवी राणा आणि नवनीत राणा यांनी दोन्ही हात जोडले. हात उंचावले आणि दोघांनी लगेच दुसरीकडे तोंड फिरवलं. त्यानंतर या दोघांनाही वेगवेगळ्या व्हॅनमध्ये बसवलं गेलं. यावेळी आमच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी आम्हाला फसवलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. जय श्रीराम म्हणणं गुन्हा आहे का? रावणाचाही अहंकार टिकला नाही, तिथे उद्धव ठाकरेंचा काय टिकणार? असा सवाल रवी राणा यांनी केला. तर नवनीत राणाही व्हॅनमधून हात उंचावून बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, काल ज्या आवेशात त्या बोलत होत्या. तो आज आवेश दिसला नाही. घोषणा देतानाही त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता.
रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रथम सांताक्रुझला वैद्यकिय चाचणीसाठी नेण्यात येणार आहे. त्यांना कोव्हिड नसल्याची खात्री करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात नेणार आहेत. रवी राणा यांना ऑर्थर रोड तुरुंगात नेण्यात येणार होतं. मात्र, तिथली कैद्यांची क्षमता संपली आहे. त्यामुळे नव्या कैद्याला प्रवेश नसल्याने त्यांना तळोजा तुरुंगात नेण्यात येत आहे. तर नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.