मोठी बातमी! लोकलचा डबा रेल्वे रुळावरुन घसरला, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

| Updated on: May 01, 2024 | 5:58 PM

हार्बर रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनच्या इंजिनाचा डबा रुळाखाली घसरला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम पडला आहे.

मोठी बातमी! लोकलचा डबा रेल्वे रुळावरुन घसरला, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
लोकलचा डबा रेल्वे रुळावरुन घसरला, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Follow us on

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनच्या इंजिनाचा डबा घसरला आहे. ही लोकल ट्रेम प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर लागण्यासाठी येत होती. यावेळी लोकल ट्रेनच्या इंजिनचा डबा रेल्वे रुळावरुन घसरला. त्यामुळे हार्बर रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांमधील ही दुसरी घटना आहे. याआधीदेखील अशीच घटना दुपारच्या सुमारास घडली होती. त्यानंतर आज ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे रुळावरुन इंजिनचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे हार्बर मार्गावरील वडाळा ते सीएसएमटी दरम्यानचा रेल्वे मार्ग काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.

संबंधित लोकल ट्रेन ही रिकामी होती. ती चाचणी दरम्यान रेल्वे रुळावरुन घसरली आहे. ही ट्रेन सांडपाडा यार्डातून सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर लागत होती. पण यावेळी अचानक इंजिनचा डबा रुळाखाली घसरला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ट्रेनमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पण घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 चा परिसर सील केला. यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. डबा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

संध्याकाळची वेळ ही सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची सुट्टीची वेळ असते. कर्मचारी यावेळी आपापल्या घरी जायला लागतात. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते. या दरम्यान आज महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांनी सुट्टी आहे. असं असलं तरी फिरण्यासाठी घराबाहेर पडणारे नागरीक आणि खासगी कार्यालयाचे लाखो कर्माचारी हे लोकल ट्रेनने प्रवास करतात. संध्याकाळची वेळ ही धरी जायची वेळ असते. त्यामुळे अशावेळी लोकल ट्रेनचा वाहतुकीचा खोळंबा बसला तर प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं.

रेल्वे विभागाचं युद्ध पातळीवर काम सुरु

परिस्थितीचं गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनदेखील कामाला लागलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून तातडीनं ट्रॅक दुरुस्ती सामुग्रीची जमवाजमव केली जातेय. प्लॅटफॉर्म पूर्णपणे रिकामा करण्यात आलाय. पूर्ण काम होण्यासाठी साधारणतः दोन तास लागू शकतील. तोपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून पनवेल, खारघरला जाणाऱ्या लोकल सोडल्या जातील. सुट्टीचा दिवस असल्यानं आज प्रवाशांची गर्दी कमी दिसत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून या घटनेवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “काही अपरिहार्य परिस्थितीमुळे हार्बर लाईन सेक्शनमधील लोकल ट्रेन सीएसएमटी – वडाळा रोड दरम्यान बंद ठेवण्यात आली आहे. प्रवाशांना सीएसएमटी आणि कुर्ला सेक्शन दरम्यान अप आणि डाऊन दिशेने मेनलाइनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे”, अशी प्रतिक्रिया प्रशासनाकडून देण्यात आली आहे. “ट्रायल करत असताना रिकाम्या रेकची दोन चाके सीएसएमटीजवळ रुळावरून घसरली. सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यानच्या लोकल गाड्यांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिर आहोत”, अशीदेखील प्रतिक्रिया रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.