मुंबई : “महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरु झाली (Health Minister Rajesh Tope on gym shopping mall reopening) आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करावेत का, याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. मात्र लोकल ट्रेन सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यात आयसीयू बेड्सची कमतरता, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांचा विनयभंग, प्लाझ्मा दान यासारख्या अनेक विषयांवर भाष्य केलं.
शॉपिंग मॉल सुरु करण्याचा विचार
“महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा जिम सुरु कराव्यात का, याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. जिम हे लोकांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. तसेच राज्यातील शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबतही विचार केला जाईल,” असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
“नालासोपारा, वसई, विरार या भागातून मोठ्या संख्येने लोक मुंबईत कामाला येतात. त्यामुळे लोकल सेवा सुरु कराव्यात अशी मागणी अनेकजण करत आहे. लोकांची मागणी रास्त आहे. मात्र ट्रेनमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळलं जात नाही. त्यामुळे ट्रेन सुरु करायच्या की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,” असे राजेश टोपे म्हणाले.
क्वारंटाईन सेंटरबाबत लवकरच गाईडलाईन्स
“राज्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये होणाऱ्या घटना निंदनीय आहे. या सर्व घटनांनी माणुसकीला काळिमा फासल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीर क्वारंटाईन सेंटरबाबत लवकरच गाईडलाईन्स तयार केल्या जातील. तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे रुम किंवा वॉर्ड करण्यात येतील. तसेच यात अंतरही ठेवलं जाईल. जर यासाठी काही नियम बदलावे लागले तर तेही आम्ही बदलू. तसेच या सर्व घटनांना जे जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असे राजेश टोपे यावेळी (Health Minister Rajesh Tope on gym shopping mall reopening) म्हणाले.
धारावीत प्लाझ्मा बँक सुरु करणार
“अँटीबॉडिज किंवा प्लाझ्मादान हे फार महत्त्वाचे आहे. प्लाझ्मा दान करण्याचे सेंटर वाढवण्यात येत आहेत, जेणेकरुन जास्तीत जास्त प्लाझ्मा घेतला जाऊ शकतो. लवकरच धारावीत प्लाझ्मा बँक सुरु करण्यात येईल. याबाबत आयसीएमआरने काही कडक नियम शिथिल केले तर जास्तीत जास्त लोकांना प्लाझ्मा देता येतील,” असेही राजेश टोपे म्हणाले.
पुण्यात मिशन झिरो प्रक्रिया राबवणार
“पुण्यात आय.सी.यू बेडची संख्या कमी आहे. मात्र जनरल बेड उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयांसाठी आम्ही जे नियम लावले आहेत, त्याचे पालन व्हायला हवं. जे दर आम्ही ठरवले आहे, त्यानुसार दर आकारले गेले पाहिजे. जास्त दर घेणे हा रुग्णालयाचा अक्षम्य गुन्हा आहे. कोणत्याही रुग्णाचे हाल होता कामा नये.”
“पुण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे. याबाबत नीट अंमलबजावणी होत नाही, असं दिसून येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत कॅशलेस असली पाहिजे. स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. बेड उपलब्ध आहेत. आम्ही बेड वाढवण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू केली आहे. जर एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा होत असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल.”
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“पुण्यातही मिशन झिरो ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या ठिकाणी अॅक्टिव्ह रुग्ण संख्या कमी करणे, बेडची संख्या वाढवणे, आयसोलेशन करणे, टेस्ट करणे या सगळ्या गोष्टी अमलात आणल्या जात आहेत. सिंगल पॉईंट कॉन्टेक्ट ही प्रणाली तयार केली जाईल. ही संकल्पना नाशिक, पुणे एम एम आर रिजनमध्ये राबवली जाणार आहे. जेणेकरुन एका ठिकाणी सर्व माहिती गोळा होईल. त्यामुळे कोरोना संख्येत अटकाव आणण्यास मदत होईल,” असे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात चाचण्यांच्या संख्येत वाढ
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना चाचणीवरुन राज्य सरकारवर टीका केली होती. “देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सल्ल्याचा आम्ही स्वागत करतो. आम्ही टेस्टिंग लॅबची संख्या वाढवत आहोत. तसेच अँटिजेन टेस्टही प्रत्येक जिल्ह्यात वाढवत आहोत. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यांच्या तुलनेत आपण सर्वाधिक टेस्ट करत आहोत. तसेच याबाबतची पूर्ण पद्धत पारदर्शी आहे,” असा टोला राजेश टोपे यांनी लगावला.
“विरोधी पक्षाने त्यांचं काम करावं. त्यात राजकारण नको. चांगल्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो. त्यावर कामही केलं जाईल. त्यांना त्यांच्या जीआरची आठवण करुन देण्यात आली आहे. महाराष्ट्राने टेस्ट वाढवल्या आहेत. त्यामुळे राज्यातून खरे आकडे समोर येत आहेत. ICMR च्या सूचनांचं पालन काटेकोरपणे सरकार करत आहेत,” असेही राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope on gym shopping mall reopening) म्हणाले.
संबंधित बातम्या :
Panvel Rape | पनवेल क्वारंटाईन सेंटर बलात्कार प्रकरण, आरोपी कोरोनाग्रस्त, पीडितेची पुन्हा चाचणी
नालासोपारा स्टेशनवर प्रवाशांचा उद्रेक, रेल्वे रुळांवर उतरत लोकल अडवली