मुंबई : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर कालपासून मुंबईसह ठाण्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आजही पहाटेपासून मुंबईसह ठाण्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे मुंबई-ठाणेकरांची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मात्र, या पावसाचा रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. रेल्वे सेवा व्यवस्थित सुरू असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, मुंबईतील काही भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई शहरासह उपनगरांमध्ये आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. रात्रभर विश्रांती घेतलेल्या पावसाची मुंबई शहरात पहाटेपासून दमदार हजेरी लावली. दादर, माटुंगा ,माहीम हाजी अली परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मलाड, अंधेरी, गोरेगावमध्ये सकाळपासून अधूनमधून पाऊस सुरू आहे. आज दिवसभर मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तसेच मुंबई शहराला 3 दिवसाचा येल्लो अलर्टही देण्यात आला आहे.
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याचा फटका विधानभवन परिसरात तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या शेडला बसला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने शेडवरील काहीसा भाग पडला होता. त्यानंतर पुन्हा शेड बांधण्यात आलेलं आहे. सुदैवाने शेड पडल्याने कुणालाही इजा झाली नाही.
दरम्यान, पुणे शहरात गेल्या दहा वर्षातील आतापर्यंतचा सर्वात कमी पाऊस झाला आहे. शहरात यंदा जून महिन्यात केवळ 83.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षांमधील या महिन्यातील हा तिसरा सर्वात कमी पाऊस नोंदविला गेला आहे. 2014 मध्ये केवळ 13.8 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर 2022 मध्ये 35 मिमी पावसाची नोंद झाली होती. जुलै महिन्यातील 15 दिवस संपले असून आतापर्यंत केवळ 40 मीमी पावसाची नोंद झाली असून ही गेल्या दहा वर्षांमधील सर्वात कमी पावसाची नोंद ठरली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात वरुण राजाची कृपा झाली आहे. या हंगामात सुरगणा तालुक्यात 384 मिमी पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरी, पेठ, त्र्यंबक येथे 200 मिमी पेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. मात्र अन्य तालुक्यांना अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अद्यापही म्हणावा तसा पाऊस न झाल्याने बळीराजासह प्रशासन देखील चिंतेत आहे.