राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. काही ठिकाणी पावसाने जनजवीन विस्कळीत केलं आहे. अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड मुसळधार पाऊस पडला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराला पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबईत रात्रभरात तब्बल 300 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम पडला. पण आता हळूहळू रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा आता सुरु झाली आहे. विशेष म्हणजे रात्रभर पडणाऱ्या पावसाने आज सकाळी उसंत घेतली होती. पण आता मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतील पावसाबद्दल पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई या ठिकाणी 250 ते 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतूक कोंडी सुद्धा झालीय. मुंबईतील पावसाने उघडीप घेतली आहे. पुढील 24 तासात मुंबईत ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईला सध्या येलो अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली. पुढील 2 ते 3 दिवस कोकणातील घाट भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत रात्रभर प्रचंज पाऊस पडला. यानंतर आज सकाळी पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे सखल भागांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा झाला होता. मुंबईत काही ठिकाणी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. पण मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसापेक्षा त्याची तिव्रता फार कमी होती. पावसाने थोडा उसंत घेतल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत होतं. पण मुंबईत आता पुन्हा पावसाने जोर धरला आहे. दक्षिण मुंबईत तर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यानस, मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. सिंधुर्गात गेल्या 24 तासात सरासरी 216 मिमी पाऊस पडला आहे. सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं. तिथे सरासरी 270 मिमी इतका पाऊस पडला. सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील तेरेखोल आणि कर्ली नदी दुथडी भरून वाहत आहेत. पावशी आणि ओरोस येथे महामार्गावर पाणी आले होते. तर वेताळ बांबरडे गावात घरांना पाण्याचा वेढा पडला होता.
काही बाजारपेठांमध्ये पाणी शिरले होते. आज ही ऑरेंज अलर्ट असून खबरदारी म्हणून एनडीआरएफचे एक पथक जिल्ह्यात बोलवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. मात्र मध्यरात्री नंतर पावसाचा जोर ओसरला असून हलका पाऊस पडत आहे. तसे असले तरी अजूनही काही मार्ग पाण्याखाली असून सखल भागात पाण्याचा संचय तसाच आहे.