गोविंद ठाकूर/सुनील जाधव
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईकरांची सोमवारची सकाळ मुसळधार पावसाने झाली होती. आजही तीच स्थिती आहे. सोमवार मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. मुंबई उपनगरच्या कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी आणि दहिसर परिसरामध्ये रात्रीपासून अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
मुंबई शहर म्हणजे दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. अजून तरी, कुठेही पाणी साचल्यासारखी स्थिती नाही.
मुंबईत कुठे पाणी भरू शकतं?
कालही सकाळच्या सुमारास असाच पाऊस झाला होता. रविवारी मध्यरात्री या पावसाला सुरुवात झाली होती. दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. आज मंगळवारी सकाळी अनेक भागांना पावसाने झोडपून काढलय. पावसाचा असाच जोर राहिला, तर अंधेरी सबवे, मालाड सबवेसह अनेक सखल भागात पाणी साचू शकतं.
17/07: Mumbai next 2,3 days heavy rainfall alerts by IMD??.
Watch for inundations in low lying areas, temporary structures, transport road & rail, open drains, trees, and ofcourse your health too.
काळजी घ्या … pic.twitter.com/aO4YotGsli— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 17, 2023
हवामान विभागाचा काय अलर्ट आहे?
पावसामुळे अजूनतरी मुंबई रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली नाही. लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे, त्यात अजून तरी कुठे अडथळा आलेला नाही. तिन्ही मार्गावर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे. मुंबईकर बेस्टवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. तिथेही सर्व सुरळीत आहे. पुढच्या 2-3 दिवसात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत काही ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
कल्याण-डोंबिवलीत पावसामुळे काय स्थिती आहे?
कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला आहे. मध्य रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण रामबाग परिसरात रत्यावर पाणी साचल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत शाळा गाठावी लागली. पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे.