मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या 24 तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असताना, त्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह दहा जिल्ह्यांमध्ये शनिवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला.
पुढील काही तासात या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, बीड, लातूर, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून, गेल्या 24 तासात मुंबईत 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने सांगितले की, शनिवार ते 10 नोव्हेंबर या कालावधीत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. केरळ आणि माहेमध्ये सोमवारी पाऊस पडू शकतो, तर आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि यानाममध्ये सोमवारी आणि मंगळवारी पाऊस पडू शकतो.
गेले चार दिवस कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले आहे. वीजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसामुळे कोकणातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, रत्नागिरी तालुक्यात जोदार पाऊस झाला. रायगडमध्ये खोपोली, खालापूर, सुधागड, पेण, नागोठणे, श्रीवर्धन, म्हसळा, गोरेगाव, माणगाव, उरण तालुक्यात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची नोंद झाली.
उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर जुन्नर आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना आज सायंकाळी जोरदार अवकाळी पावसाने झोडपले असून ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. पावसामुळे काही भागातील शेतीचे नुकसान झाले आहे तर काही भागातील शेतकरी मात्र सुखावला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, भूईमूग यांसारख्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून नुकतेच पेरणी झालेल्या ज्वारी, हरभरा यांसारख्या पिकांना हा पाऊस मात्र वरदान ठरणार आहे.
जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील राजुरी, ओतुर ,आळेफाटा, उदापूर या गावामधील कांदा व इतर बागायती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कादा उत्पादक शेतकरी या अवकाळी पावसाने ज्यादा चितेंत आहे. आधीच मागील पावसाने झालेली नुकसान भरपाई मिळाली नाही. आता या पावसाने नुकसान झालेल्या पिकासाठी नुकसान भरपाई कधी मिळणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Heavy rains in Maharashtra in next 24 hours; Yellow alert issued by Meteorological Department in 10 districts)
इतर बातम्या
अबब! या बँकेने 84000 ग्राहकांना न मागता दिले कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण