मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज निकाल दिला. 2010 मध्ये कल्याण पोलिसांनी बजावलेल्या तडीपारच्या नोटीशीचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्यावरील गुन्हे आणि त्या अनुषंगाने न्यायालयात सुरू असलेली कारवाई रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर यापूर्वी सुनावणी झाली. 15 ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज आला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीदरम्यानचे हे प्रकरण आहे. 2010 मध्ये झालेल्या या निवडणुकीत राज ठाकरे यांना कल्याण डोंबिवली मनपाच्या हद्दीत तडीपारची नोटीस बजावली होती. ती नोटीस राज ठाकरे यांनी स्वीकारली नव्हती. त्यानंतर त्यांच्या कार्यालयावर ही नोटीस लावण्यात आली. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत राज ठाकरे कल्याणमध्ये आले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज ठाकरे यांनी पक्षाचे कार्यालय, निवासस्थान, हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसला भेट देऊ नये, असेही तडीपारच्या नोटिशीत म्हटले होते. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२६ नुसार खटला दाखल करण्याचे म्हटले होते. त्यानंतर राज ठाकरे कल्याणमध्ये आले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 2011 मध्ये कल्याण येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. कल्याणचे पोलीस उपायुक्त यांच्या निर्णयास राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर या खटल्याचा सुनावणी झाली. हा खटला रद्द करण्यात यावा यासाठी राज ठाकरे त्यांचे वकील सयाजी नांगरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देत राज ठाकरे यांना दिलासा दिला.