मुंबई: तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी (Minister Ponmudi) यांनी हिंदी भाषेची अवहेलना केली आहे. हिंदी भाषाही पाणीपुरीवाल्यांची भाषा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या वादात आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेतली असून हिंदी भाषेवरून (Hindi Language Controversy) थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच आव्हान दिलं आहे. एक देश, एक संविधान आणि एक भाषा हे सूत्रं आता शहांनी लागू करण्याचं आवाहन स्वीकारावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच हिंदीवरून राऊत यांनी तामिळनाडूच्या मंत्र्याचे कानही उपटले आहे. हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळे हिंदीचा सर्वांनी रिस्पेक्ट केलाचा पाहिजे. आदर ठेवलाच पाहिजे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा सल्ला दिला आहे.
मी आणि माझा पक्ष हिंदी भाषेचा सन्मान करतो. संसदेत मी हिंदीतच बोलतो. कारण देशाने माझं म्हणणं ऐकावं. हिंदी ही देशाची भाषा आहे. त्यामुळे या भाषेचा सन्मान व्हावा. एक देश, एक संविधान आणि एक भाषा याचं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारलं पाहिजे, असं आवाहनच संजय राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, मुंबईच्या बीकेसी मैदानावर आज शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, असं राऊत यांनी शायराना अंदाजमध्ये ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच आज क्रांतिकारी दिवस असल्याचं सांगून उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण वादळी होणार असल्याचे संकेतही दिले आहेत. या आधी शिवसेनेने तीन टीझर लॉन्च करून उद्धव ठाकरे यांची सभा विराट होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही. शिवसेना आणि गर्दीचं अतूट नातं आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
राऊत यांनी उद्घव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच एक ट्विट करून सभा किती विराट असेल याची माहिती दिली आहे. लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, कूछ लोग भूल गये है.. अंदाज हमारा!!! जय महाराष्ट्र! आज क्रांतिकारी दिवस!!, असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.
तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी शुक्रवारी हिंदीबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. हिंदी भाषा बोलल्याने नोकरी मिळाली असती तर हिंदी भाषिक लोक इकडे येऊन पाणीपुरी विकत असते काय? असा त्यांनी सवाल केला होता. राज्यपालांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमातून पाणी पुरी कोण विकतंय असा सवालही त्यांनी जनतेला केला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.