मुंबई | 25 जुलै 2023 : राज्यात अनेक विभागात कंत्राटी भरती प्रक्रिया राबवली जाते. अगदी शिक्षकांची पदेही कंत्राटने भरली जात आहेत. त्यालाही विरोध असताना पोलीस दलातही कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त आले होते. मुंबई पोलीस दलात तब्बल तीन हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय झाला असल्याचे म्हटले जात होते. ११ महिन्यांसाठी ही कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे म्हटले गेले. परंतु यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
गेल्या काळापासून राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया रखडली आहे. मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मागील पोलीस आयुक्तांनी सुमारे 4500 पोलिसांना जिल्हा बदल्यांसाठी सोडले होते. त्यामुळे मुंबई पोलिस दलात मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता निर्माण झाली. राज्यात पोलिसांची 10 हजार पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरु आहे.
मुंबई पोलिस दलात पोलिस भरती सुद्धा कंत्राटी स्वरुपाची होणार असल्याचे बातमी आली. ही पोलीस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची नसल्याचे गृहविभागाने म्हटले आहे. यासंदर्भात माहिती गृहविभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेली आहे.
पोलीस दलातील प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार आहे. पोलीस भरती करुन नियमित पोलीस होईपर्यंत मुंबईची कायदा-सुव्यवस्था वार्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुमारे 3000 मनुष्यबळ भरण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय नियमित पोलिस उपलब्ध होत नाही, तोपर्यंतसाठी आहे. नियमितत पोलीस उपलब्ध झाल्यास त्यांची सेवा घेण्यात येणार नाही, असे गृहविभागाने स्पष्ट म्हटले आहे.
आधीच्या सरकारने आठ हजार शिपाई आणि वाहनचालक या पदांची भरती सुरू केली होती. भरतीप्रक्रिया निवड केलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागतो. तोपर्यंत राज्य सुरक्षा महामंडळाकडून कर्मचारी घेतले जाणार होते.