विनायक डावरुंग , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 15 डिसेंबर 2023 : म्हाडाच्या वसाहतीत रहाणाऱ्या मुंबईकरांना प्रचंड मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ही घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील म्हाडाच्या निवासी वसाहतीत रहाणाऱ्या हजारो मुंबईकरांना भुर्दंडपासून सुटका होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील म्हाडा वसाहतींचा तब्बल 384 कोटींचा दंड माफ केला जाणार आहे. मुंबईकरांना हे मोठं गिफ्ट मानलं जात आहे.
मुंबईत अलिकडे गृहनिर्माण व सहकार परिषद झाली होती. या परिषदेत बऱ्याच आमदारांनी आणि सदस्यांनी म्हाडाच्या 56 वसाहतींचा सेवा शुल्क माफ करण्याची मागणी केली होती. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील म्हाडाच्या 56 वसाहतींचे सेवा शुल्क माफ करण्याचे आश्वासन दिले होते. यावर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या 56 वसाहतींचे सेवा शुल्क माफ करण्याची घोषणा आज केली. या निर्णयामुळे म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या मुंबईकरांकडून दंड म्हणून वसुल केले जाणारे 384 कोटींचे सेवा शुल्क माफ केले जाणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या वसाहतीत राहणाऱ्या 50 हजार रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
मुंबईतील म्हाडाच्या वसाहतीत रहाणाऱ्या रहिवाशांकडून हा कर वसुल केला जात होता. हा कर पालिका आणि बेस्ट मिळत होता. हा सेवा शुल्क कर पन्नास टक्के माफ करण्यात आला होता. मुंबईकरांना या कराचा भुर्दंड सहन करावा लागत होता. या प्रकरणी भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांनी मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे म्हाडा वसाहतीतील रहिवाशांचा 384 कोटीचा भुर्दंड माफ केला जाणार आहे.