मुंबई : ठाकरे घराणं आणि वक्तृत्व याचं अतूट नातं आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वक्तृत्वाचा हा वारसा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढे सुरू ठेवला आहे. राज ठाकरे हे आजच्या घडीचे आघाडीचे फर्डे वक्ते आहेत. पण राज ठाकरे यांच्याकडे वक्तृत्व गुण आले कसे? त्यांनी पहिलं भाषण कधी केलं? कुठे केलं? या भाषणाचा किस्सा काय आहे? याची सर्वांनाच उत्सुकता असते. राज ठाकरे यांनी आज व्हिजेटीआय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या भाषणाचा पहिला किस्सा सांगितला.
मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा त्या दिवसासारखा वाईट दिवस कोणता नसतो. भाषण करताना माझ्या हाताला घाम येतो. मुंग्या येतात. कारण मला माहीत नसतं मी काय बोलणार ते. अनेकदा तर मी भाषण करण्यासाठी नोट्स काढून गेलो. पोडियमवर नोट्स ठेवले. पण त्या व्यतिरिक्त बोललो. मी ठरवून कधी भाषण करत नाही. मनात वाटतं ते बोलतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
मला माझं पहिलं भाषण आठवतं. हा प्रसंग आधीही सांगितला आहे. एका मोर्चात पहिलं भाषण केलं होतं. मोर्चा संपला. त्यानंतर कोणी तरी येऊन सांगितलं. माँ आली. माँ म्हणजे मीनाताई आल्या होत्या. त्या मागे गाडीत बसल्या होत्या. त्या भाषण ऐकायला आल्या होत्या. मी त्यांना भेटलो.
त्या म्हणाल्या, काकांनी बोलावलं. दोन अडीच वाजले होते. साहेब बसले होते. ते म्हणाले. बस. ही गोष्ट आहे 1991 मधील. मला म्हणाले बस. मी तुझं भाषण ऐकलं. त्यावेळी मोबाईल फोन नव्हता. कोणी तरी पानटरीतून फोन लावला होता. त्यावरून बाळासाहेबांना भाषण ऐकवलं होतं, असं राज ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांनी सांगितलं. माझ्या बापाने जे सांगितलं ते तुला सांगतो. काही नियम सांगतो. जे मैदान असेल त्याची भाषा बोल. कसं बोललो ते महत्त्वाचं नाही. समोरच्या लोकांना काय खुराक दिला हे बघ. आपण किती शहाणे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करू नको. ते कसे शहाणे आहेत त्याचा विचार कर. या दोनचार गोष्टी लहानपणी ऐकल्या. तेच मी अनुसरत असतो. त्यानुसारच भाषण करत असतो, असं त्यांनी सांगितलं.
मी साप्ताहिक आणि वर्तमानपत्रात व्यंगचित्र काढत होतो. मला सोशल मीडियावर व्यंगचित्र काढायला आवडत नाही. सोशल मीडियाला आईबाप नसतो. सोशल मीडियावरील बऱ्याच गोष्टी बेवारस असतात. व्यंगचित्र म्हणून मला जे दिसतं ते माझ्या भाषणात येतं. ते माझं निरीक्षण असतं, असंही त्यांनी सांगितलं.