उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्यात… काय म्हणाले संजय राऊत?

| Updated on: Oct 02, 2023 | 1:42 PM

जनरल व्ही. के. सिंग हे स्वतः आर्मीचे प्रमुख होते. तेव्हा त्यांना पीओकेला भारतात आणायची संधी मिळाली होती. पण त्यांनी आधी मणिपूर वाचवावा. मणिपूरमध्ये जे होत आहे. त्यावर बोला. जनरल व्हिके सिंग मणिपूर वाचणार की नाही ते सांगा, असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्यात... काय म्हणाले संजय राऊत?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : खरी शिवसेना कुणाची? हा प्रश्न निवडणूक आयोगाने सोडवला आहे. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचा ताबा आणि चिन्ह दिलं आहे. मात्र, ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. खरी शिवसेना आमचीच आहे, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. याच मुद्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. जेव्हा उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्याचे नगरसेवक होते, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.

निवडणूक आयोग हा आयोग राहिला नाही. तो कळसूत्री बाहुलं बनला आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत. बाळासाहेंबानी त्यांच्या हयातीतच उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली होती. पक्षातून काही लोक फुटले. त्यांनाच निवडणूक आयोगाने पक्ष दिला. हा सरळ सरळ अन्याय आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्याचे नगरसेवक होते. मग शिवसेना त्यांची कशी झाली? बाळासाहेब ठाकरेंच्या निधनावेळी शिंदे फार तर आमदार असतील. ते नेते नव्हते. आणि आज तुम्ही अचानक ही शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचं सांगता. हे निवडणूक आयोग आहे की कोणतं दुकान आहे? हे तर दुकान आहे कुणाचं तरी, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

भाजप खेळ करतंय

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगाकडील सुनावणीची तारीख जाहीर केली होती. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका करत निवडणूक आयोग काहीही निर्णय घेऊ शकते, अशी भीती व्यक्त केली होती. त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी पटेल यांच्यावर टीका केली. तसेच सुप्रिया सुळे यांची भीती रास्त असल्याचंही स्पष्ट केलं. या अनुभवातून शिवसेना गेली आहे. भाजपचे लोक या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळ करत आहेत. सर्व घटनात्मक संस्था त्यांनी ताब्यात घेतलं आहे. सर्वोच्च न्यायालय सोडलं तर सर्व त्यांच्या हाती आलं आहे, असं राऊत म्हणाले.

भीती रास्त

प्रफुल्ल पटेल यांना कदाचित निवडणूक आयोगाच्या सदस्यपदी बसवलं असेल. आमची सुनावणी सुरू असताना शिंदे गटाचे लोक अशी स्टेटमेंट देत होते. सुनावण्याच्या तारखा सांगत होते. निकाल काय लागेल हेही सांगत होते. या लोकांना आधीच कसं माहीत पडत होतं. बहुतेक शिंदे गटाचे काही लोक तेव्हा निवडणूक आयोगाचे सदस्य झाले असतील. त्यामुळे त्यांना ही माहिती मिळायची.

आता पटेलही निवडणूक आयोगाचे सदस्य झाले असतील. त्यामुळे तेही तारखा देऊ लागले आहेत. राष्ट्रवादीचा निर्णय लागेपर्यंत पटेल यांना काही काळ निवडणूक आयोगाचा सदस्य म्हणून ठेवलं जाईल, असा चिमटा काढतानाच निवडणूक आयोग शिवसेनेचं स्वामित्व एका गटाला देऊ शकतात तर सुप्रिया सुळे यांची भीतीही रास्तच आहे, असं राऊत म्हणाले.