अभिमन्यू देवेंद्र फडणवीस यांनी असा तोडला चक्रव्यूह, विरोधकांना दिले सडेतोड उत्तर

| Updated on: Dec 04, 2024 | 2:44 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचे जुने व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईल हा व्हिडिओ लोकं पुन्हा पुन्हा शेअर करत आहेत.

अभिमन्यू देवेंद्र फडणवीस यांनी असा तोडला चक्रव्यूह, विरोधकांना दिले सडेतोड उत्तर
Follow us on

देवेंद्र फडणवीस गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज झालेल्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. कोअर कमिटीच्या बैठकीत देखील एकमताने फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील निरीक्षक म्हणून आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सोशल मीडियावर लोकं देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करताना दिसत आहे. भाजप कार्यकर्त्यांना जल्लोष करायला सुरुवात केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित होताच सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचे काही जुने व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. देवेंद्र फडणवीस जेव्हा सभागृहात म्हणाले होते की, ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा।’ देवेंद्र फडणवीस यांनी 2019 पासून या ओळी अनेकदा बोलून दाखवल्या. आता ती गोष्ट खरी होताना दिसत आहे.

फडणवीसांना अभिमन्यू का म्हणतात?

देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक निवडणुकीत स्वतःला अभिमन्यू असे म्हटले होते. त्यांचं हे वाक्य देखील लोकं सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ते म्हणाले होते की, मी आजचा अभिमन्यू आहे, त्याला चक्रव्यूह कसे मोडायचे आणि कसे जिंकायचे हे दोन्ही माहित आहे.

मी पुन्हा येईन – फडणवीस

2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना जनाधार मिळाला असतानाही मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते. पण 2022 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते. पण त्यांनी वरिष्ठाचा आदेश मान्य करुन ते स्वीकारले होते. मी पुन्हा येईन त्यांच्या या ओळीवर महाविकासआघाडी आणि उद्धव ठाकरे यांनी अनेकदा त्यांची खिल्ली देखील उडवली होती. पण आता फडणवीस पुन्हा आले आहेत.

एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री केले आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले तेव्हा देखील उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीने फडणवीसांना खूप टोमणे मारले होते. फडणवीस हे राजकीय चक्रव्यूहात अडकले अशी टीका त्यांनी केली होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, ‘फडणवीस एकटे काय करू शकतात?’ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाआघाडीला चांगलं यश मिळालं. ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची कहाणी संपली असे अनेकांना वाटले होते. पण ते चुकीचं ठरलं.

भाजपची राज्यातील सर्वोत्तम कामगिरी

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं. अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या या निवडणुकीत त्यांनी अभूतपूर्व 85% स्ट्राइक रेटसह 132 जागा निवडून आणल्या. त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपची ही राज्यातील सर्वोत्तम कामगिरी होती. ‘मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसा मोडायचा हेही मला माहीत आहे आणि मला जिंकायचंही माहीत आहे’. हे वाक्य निवडणूक प्रचारादरम्यान चांगलंच चर्चेत आलं होतं.

महाराष्ट्रातील विजयाला भाजपमधील अनेकजण फडणवीस यांच्या रणनीतीला श्रेय देतात. फडणवीस हे भाजपच्या त्या मूठभर नेत्यांपैकी एक आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या दोघांचेही आवडते नेते आहेत. संघाच्या विचारसरणीशी खोलवर रुजलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांच्या वडिलांच्या संघटनेशी असलेल्या दृढ आणि अतूट सहवासामुळे त्यांची एक निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून प्रतिमा आणखी मजबूत झाली.