महायुतीतल्या छोट्या मित्रपक्षांच्या जागांची बोहनी होणार? वाचा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Mar 07, 2024 | 10:33 PM

जागा वाटपावरुन भाजपसोबत शिंदे आणि अजित दादांच्या गटाची रस्सीखेच सुरु आहे. त्यातच छोट्या मित्रपक्षांनीही जागांची मागणी केलीय. त्यामुळं आठवलेंसह सदाभाऊ खोतांना भाजप वाटा देणार का? पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट!

महायुतीतल्या छोट्या मित्रपक्षांच्या जागांची बोहनी होणार? वाचा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us on

मुंबई | 7 मार्च 2024 : महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल याची उत्सुकता लागलेली असतानाच छोट्या मित्रपक्षांनीही जागांची मागणी केलीय. भाजप आणि महायुतीचे छोटे मित्रपक्ष पाहिले तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं 2 जागांची मागणी केलीय. रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष महायुतीत आहे. त्यांची पत्नी नवनीत राणा अमरावतीतून खासदार असून त्या भाजपच्या तिकीटावर लढणार हे जवळपास निश्चित आहे. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेनं भाजपकडे हातकणंगले मतदारसंघ मागितलाय. महादेव जानकरांचा रासप म्हणायला महायुतीत असला तरी जानकरांचा कल महाविकास आघाडीकडे असून शरद पवार माढ्याची जागा सोडू शकतात.

बच्चू कडूंची प्रहार महायुतीचा घटकपक्ष आहे. मात्र लोकसभा लढणारच नसल्याचं बच्चू कडू म्हणालेत. त्यामुळं त्यांना जागा सोडण्याचा प्रश्नच नाही. जनसुराज्य पक्षांचे विनय कोरेही महायुतीचा भाग आहेत. पण त्यांनीही भाजपकडे जागा मागितलेली नाही. त्यामुळं त्यांना जागा सोडण्याचा विषय नाही.

2019च्या लोकसभा निवडणुकीत, भाजप आणि उद्धव ठाकरेंची युती होती आणि त्यावेळीही छोट्या मित्रपक्षांना एकही जागा सोडलेली नव्हती. आता शिंदेंची शिवसेना आणि अजित दादांच्या राष्ट्रवादी सोबतच जागा वाटपावरुन खल सुरु आहे. नवनीत राणांची अमरवातीची जागा सोडली तर आठवले, खोतांना भाजप जागा सोडणार का? हा प्रश्न आहे.