मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई पोलिसांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे (Huge traffic jam at Dahisar Toll Naka). पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. याशिवाय वाहन चालकांची कसून चौकशी करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालक सर्व नियमांचं पालन करत आहेत का? याकडे पोलिसांकडून अत्यंत बारकाईने लक्ष दिलं जात आहे. मात्र, पोलिसांच्या या कारवाईमुळे दहिसर टोल नाक्यावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे (Huge traffic jam at Dahisar Toll Naka).
पोलिसांच्या नाकाबंदीमुळे दहिसर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर मुंबईत हळूहळू काही उद्योग, व्यवसाय, खासगी कार्यालये सुरु होत आहेत. मुंबई उपनगर, दहिसर, भाईंदर, ठाणे या भागातील शेकडो नागरिक कामानिमित्ताने मुंबईच्या दिशेला जात आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या गाड्यांची संख्यादेखील वाढली आहे. पोलीस या सर्व गाड्यांची तपासणी करत आहेत.
हेही वाचा : पाकिस्तानात दहशतवादी हल्ला, स्टॉक एक्सेंजमध्ये अंधाधुंद गोळीबार
मुंबईत कोरोनाचं मोठं संकट आहे. फक्त राज्यातच नव्हे तर देशभरातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं जरुरीचं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. वाहनचालकांनी नियमांचं उल्लंघन केलं असेल तर दंडदेखील आकारला जात आहे.
या कारवाई दरम्यान पोलिसांना मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या काही चारचाकी गाड्यांवर अत्यावश्यक सेवेचा स्टिकर लावला नसल्याचं निदर्शनास आलं. पोलीस अशा गाड्यांना बाजूला घेऊन वाहनचालकांना नेमकं कुठल्या कारणासाठी घराबाहेर निघालात? अशी विचारपूस करत आहेत. जर दोन किमी परिघाच्याबाहेर ती व्यक्ती आली असेल तर कारवाई केली जात आहे. अशा लोकांचे वाहनं जप्त केले जात आहेत.
दरम्यान, आज आठवड्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे अनेक सरकारी कार्यालयाचे कर्मचारी, तसेत खासगी कंपन्यांचे कर्मचारी मुंबईच्या दिशेला जात आहेत. मात्र, या कर्मचारी वर्गाला पोलिसांच्या कारवाईचा मोठा फटका बसत आहे.
दहिसर टोल नाका, कांदीवली येथील एस वी रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील समता नगर, बोरीबली, मालाड मार्वे रोड, बोरीवली कोरा केंद्र ब्रिज या ठिकाणी मुंबई पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. कांदिवली येथे तर पोलीस पीपीई किट घालून कारवाई करत आहेत.
मुंबई पोलिसांच्या या कारवाईवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबई पोलिसांची कारवाई ही नियमानुसार आहे. नियमबाह्य पद्धतीने घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होणार. पोलिसांची कारवाई म्हणजे लॉकडाऊन वाढवले असं होत नाही. दुचाकीवर डबल सीट, किंवा एका गाडीत चार जण दिसले, तर कारवाई होणारच”, असं राजेश टोपे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं.