मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : मी भाजपसोबत पॅचअप करू शकलो असतो. पण माझ्या नितीमत्तेत बसत नव्हतं. त्यामुळे मी भाजपसोबत गेलो नाही. कारण स्वाभिमान महत्त्वाचा होता. शिवसेनेचा दरारा कायम राखणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी कोणतीही तडजोड केली नाही, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे मोठं विधान केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे यांनी ज्यांना सोडून जायचं, त्यांनी सोडून जावं, असं म्हटल्याचंही सांगितलं जात आहे.
मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो. पण माझ्या नितीमत्तेत बसत नव्हतं. 2014पासून ज्यांनी फसवलं त्यांच्यासोबत कसं जाणार? मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण जे मनाने फुटले त्यांना डांबून काय करणार होतो? त्यांना मी काय कमी केलं होतं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
जुने निष्ठावंत सोडून जातात त्याचे वाईट वाटते. तुमच्या पैकी कुणाला जायचे असेल तर खुशाल जाऊ शकता. संकटं येतात आणि संकटं जातात. मी खंबीर आहे. आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत, असं सांगतानाच माझा काही स्वार्थ नाही. मला निवडणूक लढवायची नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत विदर्भातील लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला जाणार आहे. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच इतर मतदारसंघावरही चर्चा होणार आहे. या बैठकीत अकोला लोकसभा मतदारसंघ वंचितसाठी सोडण्यावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मातोश्रीवरील आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आता ठाकरे गटात इनकमिंग सुरू झाली आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काल ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे नगर जिल्ह्यात ठाकरे गटाचं बळ वाढलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. चुकीला माफी आहे, परंतु पाप करणाऱ्यांना मात्र गाडायचे आहे. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी हिंमत असेल तर निवडणुकीच्या मैदानात उतरावे. आमचे शिवसैनिक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला होता.