मुंबई: गडचिरोली हा नक्षल भाग आहे. पण गडचिरोलीला आम्ही विकासाकडे नेत आहोत. गडचिरोलीत आरोग्य, शिक्षण आणि कनेक्टिव्हीटी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहोत. गडचिरोलीत बीएसएनएलची कनेक्टिव्हीटी वाढवण्यास केंद्राला सांगितलं. नक्षलवाद संपवायचा असेल तर विकासाचा अजेंडा हाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही विकासावर भर दिला आहे, असं सांगतानाच धमक्या येतात, जातात. माझ्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. माझं काम सुरू आहे. मला धमक्या आल्या तेव्हा पोलिसांनी काम दाखवलं आहे. धमक्या आल्या तरी बोलायचं नाही, आपण आपलं काम करत राहायचं हे धोरण मी ठेवलं आहे, असं राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. टीव्ही9 मराठीने आयोजित केलेल्या महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी समृद्ध महामार्गाच्या कामात आलेल्या अडथळ्यांबाबतची माहिती देतानाच त्यावर कसा तोडगा काढला हे सुद्धा सांगितलं. समृद्धी महामार्गाचं काम सुरू करणंच चॅलेंज होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आपल्या राज्याच्या हितासाठी रस्ता महत्त्वाचा आहे, असं फडणवीसांनी सांगितलं. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सहकार्य केलं. हा महामार्ग तयार करताना अनेक अडचणी आल्या. विरोध झाला. पुतळे जाळले. प्रचंड विरोध झाला. पण त्यातून आम्ही मार्ग काढलाच, असं शिंदे यांनी सांगितलं.
मी आणि राधेश्याम मोपलवार बुलडाण्यात चार्टरने गेलो होतो. तिथल्या खराब हवामानामुळे चार्टर हलत होतं. खालीवर होत होतं. म्हटलं झालं आमचं कामकाज संपलं. पण आम्ही पोहोचलो. तिथे लोकांनी महामार्गाला विरोध केला. पैसे मिळतील यावर आमचा विश्वास नाही, असं लोकं म्हणाले. आम्ही त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. करारनामा झाला की तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, असं त्यांना सांगितलं. एवढेच नव्हे तर मंत्री असूनही मी साक्षीदार म्हणून सही केली. त्यावर विरोधकांनी टीका केली. नवीन नियम सुरू केला का? असा सवाल विरोधकांनी केला. मी म्हणालो विश्वास वाटावा म्हणून सही केली, असं त्यांनी सांगितलं.
करारनाम्यावर मी सही केल्यानंतर दोन ते अडीच तासात शेतकऱ्यांचा फोन आला. खात्यात पैसे जमा झाले म्हणून त्यांनी सांगितलं. आम्ही जमिनीचा मोबदलाच नाही तर विहीर आणि गोठ्याचा मोबदलाही दिला. त्यामुळे लोकांचा विरोध होता तेवढ्याच तीव्रतेने मावळला. लोकं जमिनी देऊ लागले. खरेदी खतं होऊ लागली. दहा हजार हेक्टर जमीन आम्ही संपादीत केली. कुठेही बळाचा वापर केला नाही. खूप मोठ्या मार्गावर स्मृद्धी आली. पैसा हाता आल्याने लोकांनी हॉटेल बांधल्या. घरे बांधली. त्याला समृद्धी असं नाव दिलं. एका गावाने तर 100 बेलोरो जीप घेतल्या. त्या भागात परिवर्तन झालं, असं त्यांनी सांगितलं.
सुरुवातीला गेलो तेव्हा तिकडे ओसाड जमीन होती. आता काम पाहायला गेलो तेव्हा अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारखे ब्रँड तिथे आले आहेत. आता लोकांच्या हाताला काम मिळेल. तिथे कृषी रिलेटेड सेंटर, हॉस्पिटॅलिटी सर्व आहे. आता उद्योगही तिथे जातील, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Maha Infra Conclave : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला राज्याच्या विकासाचा लेखाजोखा
महाराष्ट्र मास्क फ्रि कधी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काय म्हणाले?