डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली, 17 वर्षात 20 पेक्षा जास्त वेळा बदली

| Updated on: Jul 21, 2023 | 9:51 PM

महाराष्ट्रातील डॅशिंग सरकारी अधिकारी म्हणून लोकप्रिय असलेले IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांमधील मुंढे यांची ही तिसरी बदली आहे.

डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली, 17 वर्षात 20 पेक्षा जास्त वेळा बदली
Follow us on

मुंबई | 21 जुलै 2023 : महाराष्ट्रातील डॅशिंग सरकारी अधिकारी म्हणून लोकप्रिय असलेले IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी आहेत. ते कडक शिस्तीचे आहेत. त्यांनी नवी मुंबई महापालिका तसेच नागपूर महापालिकेचं आयुक्त म्हणून कामकाज पाहिलं आहे. पण तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे अनेक लोकप्रतिनिधींच्या मनाच्या ब्लॅकलिस्टमध्ये त्यांचं नाव कोरलं गेल्याची असल्याची दबक्या आवाजात सातत्याने चर्चा होत असते. मुंढे यांची गेल्या 17 वर्षात 20 पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. आतादेखील अवघ्या दीड महिन्यात त्यांची बदली झाली आहे.

तुकाराम मुंढे यांची आता कृषी आणि ADF विभागात बदली करण्यात आली आहे. ते सध्या मंत्रालयात मराठी भाषा विभागात कार्यरत होते. पण आता त्यांची कृषी आणि एडीएफ विभागात बदली करण्यात आली आहे. मुंढे याआधी मराठी विभागाचे सचिव होते. पण आता बदलीनंतर ते कृषी आणि एडीएफ विभागाचे सचिव असणार आहेत.

तुकाराम मुंढे यांना मध्यंतरी अनेक महिने नियुक्ती नाही

तुकाराम मुंढे यांची दीड महिन्यापूर्वीच बदली करण्यात आली होती. गेल्या महिन्यात मुंढे यांची मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती. विशेष म्हणजे तेव्हा देखील त्यांची महिन्याभरात बदली करण्यात आली होती. तुकाराम मुंढे हे जून महिन्याआधी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे त्यापूर्वीच्या बदलीनंतर तुकाराम मुंढे यांना नियुक्तीच मिळाली नव्हती. त्यांना अनेक महिने नियुक्ती मिळाली नव्हती. त्यानंतर राज्य सरकारने 3 मे 2023 ला 10 प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश काढले होते. त्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्याही नावाचा समावेश होता.

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची देखील बदली

दरम्यान, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा परिषद CEO दिलीप स्वामी यांची देखील बदली करण्यात आली आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सोलापूर जिल्हा परिषद CEO म्हणून मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मिलिंद शंभरकर यांची महात्मा फुले जन आरोग्य सोसायटीचे CEO म्हणून बदली करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत मिलिंद शंभरकर यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. तर कोरोना काळात जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी देखील महत्त्वपूर्ण योजना राबवल्या होत्या.

जळगावचे जिल्हाधिकारी बदलले

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली आहे. प्रसाद यांची जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ पदी रमेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.