मुंबई– सध्या राज्यात विचारांचं प्रदूषण होतंय. विकृत विचार मांडले जातायत, असे शरसंधान विरोधकांवर करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनी येत्या १४ तारखेला सगळ्यांचे मास्क काढणार असल्याचा इशारा राज ठाकरे (Raj Thackeray)आणि भाजपाला (BJP) दिला आहे. बऱ्याच दिवसांनी मास्क काढून भाषण करतोय, १४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार आहे, असे संकेतही त्यांनी दिलेत. मुंबई महानगरपालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी‘ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गोरेगाव येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. थापा मारणारे खूप आहेत, पण कौतुकाची थाप मारणारे कमी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. लवकरच येत्या काळात एकच तिकीट सर्वत्र वापरता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबईत भाजपाकडून होत असलेले आरोप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांनंतर आता त्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
जे आहे ते सोडून जे नाही त्याच्याच बातम्या होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. वेगळे काही राजकीय बोलून पाणी गढूळ करणार नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांवर टीकेची संधी सोडली नाही. सर्वांसाठी पाणी धोरण असणारी मुंबई महापालिका पहिली आहे, याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नळातले पाणी दाखवायचे नाही आणि तुंबलेले पाणी दाखवायचे, असा प्रकार सुरु असल्याचे सांगत, हिंदमाताला पाणी साचू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं ठाकरे म्हणाले.
The true marker of development is equality of access to basic necessities. Keeping this at the core, CM Uddhav Thackeray ji launched the ‘Water for All’ policy today, wherein @mybmc will enable every citizen in Mumbai to have access to clean drinking water through formal sources. pic.twitter.com/D43zbbxeiH
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 7, 2022
या कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. मुंबईचा हक्काचा माणूस मुख्यमंत्रीपदावर असल्यानं बीएमसीला मोठं पाठबळ मिळतंय, असं त्यांनी भाषणात सांगितलं. सर्वांसाठी पाणी हा मुंबईसाठी मोठा ऐतिहासिक निर्णय असल्याचे ते म्हणाले. या योजनेमुळे प्रत्येक मुंबईकराला हक्काचे पाणी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबईसाठी आरोग्य,शिक्षण,वाहतूक, पाणी हे महत्त्वाचे विषय असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई वाढते आहे, मात्र राजकारणात भलतं सलतंच सुरु असल्याचं सांगत, त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. संपूर्ण देशात परवडणारा बेस्टसारखा प्रवास कुठेही नसेल, असेही त्यांनी सांगितले. पुढील दोन वर्षात तिकीट दरात वाढ न करताही बेस्ट नफ्यात येईल असे आदित्य यांनी यावेळी सांगितले. या कार्यकमाच्या निमित्ताने महापालिका निवडणुकांच्या तयारीला शिवसेना लागल्याचे दिसून आले आहे.