महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे महायुतीला आत्मचिंतन करावे लागणार आहे. राज्यात मराठा समाजाची संख्या मोठी आहे. हे पाहता सध्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळणारे विनोद तावडे यांना पक्षाचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात परत आणू शकते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महायुतीला ४५ हून अधिक जागांचा दावा करण्यात आला होता. पण त्यांना फक्त १७ जागा मिळाल्या आहेत. २३ जागा असलेल्या भाजपला यंदा फक्त ९ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मराठा तरुणांच्या नाराजीलाच सामोरे जावे लागलेय.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनाही या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. पंकजा मुंडे यांच्या जवळचे धनगर नेते महादेव जानकर यांचाही पराभवाचा धक्का बसला आहे. परभणीतून त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. भाजपला या दोन्ही जागांवर मोठा धक्का बसला आहे.
भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले ओबीसी नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा होती. पण तसे अजूनही झाले नाही. त्यामुळे याचा ही फटका त्यांना बसला असावा. भाजपला या गोष्टी हाताळण्यात अपयश आले.
अवघ्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे उपमुख्यमंत्रिपदाच्या सध्याच्या जबाबदारीचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर त्यांना पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. असं त्यांनी म्हटलंय.
मराठा, ओबीसी, एससी आणि एसटी समाजाने पाठ फिरवल्याने भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची फडणवीसांप्रती असलेली कटुता सर्वश्रुत आहे.
इतर मराठी भाषिक समाजही फडणवीस यांच्यावर नाराज होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे प्रादेशिक पक्ष फोडल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याने अनेक लोकं नाराज होते. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे त्यांना अनेक जागा गमवाव्या लागल्या. ज्या विदर्भातून देवेंद्र फडणवीस येतात, त्या नागपूरमध्ये भाजपला फक्त एक जागा जिंकता आली आहे. तेही नितीन गडकरींनी केलेल्या कामामुळे. काँग्रेसला येथे मोठं यश मिळालंय.
आता देवेंद्र फडणवीस यांच्या जागी कोणता चेहरा पुढे येऊ शकतो याची चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला नवा चेहरा हवा आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे केंद्राची पहिली पसंती असू शकतात. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस झालेले विनोद तावडे हे महाराष्ट्रातील पहिले नेते आहेत.
गेल्या काही वर्षांत विनोद तावडे यांना स्वतला सिद्ध केले आहे. त्यांच्याकडे बिहार आणि हरियाणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी सिद्ध केली. आपली राजकीय परिपक्वता त्यांनी दाखवून दिली आहे. दिल्लीच्या राजकारणात आता विनोद तावडे यांना चांगला अनुभव मिळाला आहे. ते स्वतः मराठा समाजातून येतात. त्यामुळे महाराष्ट्र भाजपला सध्या सर्वाधिक गरज त्यांची भासत आहे.