मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू लागला आहे. पावसाने आज सकाळी उघडीप घेतली होती. त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा सुरळीत होण्यास मदत झाली. पण मुंबईत आता पुन्हा पावसाचा जोर वाढू लागला आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून आज सकाळी पाऊस थांबल्यानंतर मुंबईला आधी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता हवामान विभागाकडून मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत उद्या सकाळपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे रेल्वे स्थानकांवर पाऊस सुरु आहे. दुसरीकडे संध्याकाळची वेळ असल्यामुळे काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळलेली आहे. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे चाकरमानी आपल्या घरी जाण्याचा प्रयत्नात आहेत. जास्त पावसामुळे लोकल सेवा ठप्प होण्यापूर्वी घरी लवकर पोहोचावं यासाठी प्रवाशांचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे वांद्रे परिसरात वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. तसेच मुसळधार पावसामुळे काही मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.