मुंबई : नियमांचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अस्लम शेख यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री उशीरा बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्या 7 बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. एल.ई.डी. लाईटच्या मदतीने बोटीतून मासेमारी सुरू होती. यातील सातपैकी तीन बोटींवरून एलईडी लाईटसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. संबंधित बोटी आणि जाळे देखील ताब्यात घेण्यात आले असून, बोट मालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. अध्यादेश मंजूर झाल्यानंतर राज्यापालाच्या स्वाक्षरीने तातडीने त्याची राज्यात अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. या अध्यादेशामध्ये मासेमारी करण्यासाठी काही नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत, त्याचे उल्लंघन केल्यास संबंधित बोटींवर कारवाई करण्याचे आदेश मंत्री अस्लम शेख यांनी दिले आहे. अशाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात बोटींवर काल रात्री कारवाई करण्यात आली. कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय महेश देवरे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी संजय माने, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सचिन भालेराव आणि नीरज चासकर यांचा समावेश होता.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवैधपद्धतीने मासेमारी सुरू आहे. अवैधपद्धतीने मासेमारी सुरू असल्यामुळे काही माशांच्या प्रजातीचे अस्वित्व धोक्यात आले आहे. तसेच एलईडी लाईटच्या मदतीने मासेमारी केल्यास कमी वेळेत मोठ्याप्रमाणात मासे मिळतात. मात्र यामुळे माशांच्या वाढीला पुरसावेळा मिळत नाही. परिणामी माशांची संख्या झपाट्याने कमी होते. याचा परिणाम म्हणजे भविष्यात माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होऊ शकतात. याला आळा घालण्यासाठी आता राज्यात महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत गुरुवारी रात्री साई गोल्ड, दबाळूमाता आणि अंबा या बोटींवर कारवाई करत एलईडी लाईट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
BMC | मनपा कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘आनापानसती’ प्रशिक्षणाचे आयोजन