मुंबई: सध्या शिवेसना (Shivsena) आणि भाजपा (Bjp) यांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. राज्यातील राजकारणाने टोक गाठलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेला अडचणीत आणण्याची एकही संधी भाजपा सोडत नाही. त्याचवेळी शिवसेना सुद्धा आपल्या मूळ आक्रमक वृत्तीनुसार पलटवार करते. वार-पलटवार यामध्ये राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच आज वांद्रयात एक विचित्र योगा-योग जुळून आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आमने-सामने आले होते. तुम्ही म्हणालं, आमने-सामने येण्यासारखं असं काय घडलं? तर त्याचं झालं असं की, आज वांद्रयात दोन्ही नेते एकाचवेळी आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले. त्यांनी प्रत्यक्ष गाडीतून उतरुन परस्परांची भेट घेतली नाही. पण त्यांच्या वाहनांचा ताफा समोरा-समोर आला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज वांद्रयात आले होते. मुख्यमंत्री ठाकरे हे आनंद दिघेंच्या आयुष्यावरील ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी वांद्रयात आले होते. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे खासदार नवनीत राणा यांच्या भेटीसाठी लिलावती रुग्णालयात आले होते. देवेंद्र फडणवीस हे नवनीत राणांची भेट घेऊन लिलावातीतून निघाले. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफाही कार्यक्रम आटोपून निघाला होता. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याला वाट करुन देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा ताफा थांबवण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या ताफ्यातील गाड्या पुढे निघून जाईपर्यंत देवेंद्र फडणवीसांना वाट पहावी लागली.
खासदार नवनीत राणा यांच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तुरुंगातून सुटका होताच लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. मान दुखीचा त्रास होत असल्याने नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. मागील 12 दिवसापासून खासदार नवनीत राणा व त्याचे रवी राणा तुरुंगात होते. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची 50 हजारच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका केली. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याी मातोश्री निवासस्थानबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार केला होता. त्यावेळी झालेल्या राड्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दांम्पत्याला विविध कलमांखाली अटक केली होती. राणा दांम्पत्याला जामीन मंजूर करत असताना न्यायालयाने त्यांच्यावर कडक निर्बध लावले आहेत. तसेच त्याचे पालन करण्यासही बजावण्यात आले आहे. नवनीत राणा यांनी यापूर्वी जे जे रुग्णालयातही मानच्या दुखण्यावर उपचार घेतले होते.