मुंबई: शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने (it department) तीन दिवस छापेमारी केली. त्यानंतर आयकर विभागाने आज पुन्हा एकदा धाडसत्रं सुरू केलं आहे. आयकर विभागाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राहुल कनाल (rahul kanal) आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम (sanjay kadam) यांच्या घरावर छापेमारी केली आहे. कनाल हे युवा सेनेत पदाधिकारी आहेत. तर संजय कदम हे स्थानिक शिवसैनिक आहेत. तसेच आयकर विभागाने पुण्यात आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरीही छापेमारी केल्याचं वृत्त आहे. सकाळपासूनच आयकर विभागाने ही छापेमारी सुरू केली आहेत. विशेष म्हणजे कनाल आणि कदम ही दोन्ही नावे कधीच चर्चेत नव्हती. या दोघांवरही आयकर विभागाची वक्रदृष्टी फिरल्याने शिवसेनेचे धाबे दणाणले असून या कारवायांमुळे शिवसेनेची कोंडी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राहुल कनाल हे उद्योजक आहेत. ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. या शिवाय शिर्डी देवस्थान समितीवर ते पदाधिकारीही आहेत. वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.
बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी होते. सध्या ते पुण्यातील आरटीओ कार्यालयात कार्यरत असल्याचं समजतं. ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते. आज खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापेमारी केल्याचं वृत्त आहे.
संजय कदम हे स्थानिक शिवसैनिक आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम राहतात. कदम हे केबल व्यावसायिक आहेत.
संबंधित बातम्या:
कोण आहेत राहुल कनाल, ज्यांच्या घरी आयकर विभागानं धाड टाकलीय? आदित्य ठाकरेंशी कनेक्शन?