मुंबई (दिनेश दुखंडे) : पुढच्यावर्षी लोकसभा 2024 ची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आतापासून तयारी सुरु झालीय. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या महाविकास आघाडीत जागावाटपाच सूत्र कसं असणार? याबद्दल माहिती समोर आलीय. मुंबईतील लोकसभेच्या 6 पैकी 4 जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती समोर आलीय. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र सर्वच राज्यांसाठी महत्त्वाच राज्य आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जी आघाडी सर्वात जास्त जागा जिंकेल, त्यांचा केंद्रात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. महाविकास आघाडीत लोकसभेच्या 48 जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल? या बद्दल विविध तर्क लढवले जात होते. आधी काँग्रेस-एनसीपी आणि उद्धव ठाकरे यांच्यात 16-16-16 असा समान जागा वाटपाचा फॉर्म्य़ुला असेल असं म्हटलं जात होतं. पण उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने हा दावा फेटाळून लावला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने चार आणि काँग्रेसने एक जागा जिंकली होती. या जिंकलेल्या 23 जागा सोडून उरलेल्या 25 जागांबद्दल आधी निर्णय़ घ्यावा, त्यानंतर 23 जागांपैकी काही अदलाबदली करायची असेल. तर होऊ शकते असं उद्धव ठाकरे गटाच मत आहे. 18 जागा उद्धव ठाकरे गटाने जिंकलेल्या. त्यात एक ते दोन जागा आणखी वाढू शकतात. म्हणजे 20 जागा उद्धव ठाकरे गटाला मिळू शकतात असा अंदाज आहे. मुंबईत लोकसभेच्या एकूण 6 जागा आहेत. आधी असं म्हटलं जात होत की, उद्धव ठाकरे गट 3, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 असं जागावाटप होईल. पण शिवसेना 4 आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी एक-एक जागा घ्यावी, अशी उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे.
दक्षिण आणि उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाने कोणत्या उमेदवारांना हिरवा कंदिल?
दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या जागांसाठी शिवसेना UBT गट आग्रही आहे. उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई या जागांसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट) यांनी आपापसात निर्णय घ्यावा. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात अरविंद सावंत आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात अमोल कीर्तिकर यांना पक्षाने आढावा बैठकीत उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे. दक्षिण मध्य आणि ईशान्य मुंबईत ठाकरे गटाने उमेदवाराबाबत गोपनीयता बाळगली आहे. या मतदारसंघात उमेदवारांचा शोध सुरु आहे. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे दोनवेळा खासदार म्हणून निवडून लोकसभेवर गेले. आता ते शिंदे गटामध्ये आहेत.
जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी दिली, तरच दावा घेणार मागे
मुंबईलगतच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर भिवंडी या लोकसभा मतदार संघासाठी सुद्धा शिवसेना UBT गट आग्रही आहे. ठाण्यात राजन विचारे यांना उमेदवारीसाठी हिरवा कंदील आहे. कल्याण-डोंबिवली आणि पालघरमध्ये उमेदवाराचा शोध सुरू आहे. भिवंडीवर राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) चा दावा आहे. भिवंडीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी दिली गेली, तरच शिवसेना UBT आपला दावा मागे घेणार अशी माहिती आहे.