मुंबई: कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत. त्यामुळे आरोग्याचे नियम पाळत रहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले. (CM Uddhav Thackeray discussion with Industrialist)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील उद्योजकांशी संवाद साधला. आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत अनलॉक करताना त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. स्थानिक पातळीवर प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक याबाबत निर्णय घेतील. ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’, असे आपल्याला वागावे लागेल, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना दिला.
राज्यातील इतर उद्योगांमध्ये बाहेरील राज्यातील जे कामगार काम करीत आहेत त्यांची आरोग्यविषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांनी त्यांच्या राज्यात जाताना आणि तिकडून येताना कोविडचा विषाणू पसरवू नये . त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना दिले.
या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, संजीव बजाज, बी थियागराजन, डॉ नौशाद फोर्बस, अमित कल्याणी, अशोक हिंदुजा, ए एन सुब्रमनियन, डॉ अनिश शहा, अजय पिरामल,बनमाली अग्रवाल, हर्ष गोयंका, सुनील माथुर, उज्वल माथुर, संजीव सिंग, बोमन इराणी, निरंजन हिरानंदानी, जेन करकेडा, असीम चरनिया, सुलज्जा फिरोदिया हे उपस्थित होते.
येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट आली आणि आणि लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर , उत्पादनावर परिणाम झाला नाही पाहिजे. आपण जसे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी उद्योजकांना दिला.
निर्बंधांसंदर्भात निकष आणि लेव्हल्स (पातळ्या) चा निर्णय चांगला आहे. याबाबत लोकांमध्ये योग्य रीतीने जनजागृती होणे अपेक्षित आहे. विशेषत: ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी उद्योजक मदत करतील व योगदान देतील. उद्योग क्षेत्राशी संबंधित असंघटीत वर्गाचे लसीकरण व इतर काळजी घेणं आवश्यक आहे. आयटी क्षेत्राने वर्क फ्रॉम होमवर पुढील काही महिना भर द्यावा, असा प्रस्ताव उद्योजकांनी मांडला.
उद्योगांनी केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांचेच नाही तर त्यांच्या परिवारांचेही लसीकरण जलद गतीने करावे.पहिल्या पातळीमध्ये आपण लोकांना विविध कारणांसाठी , समारंभ, कार्यक्रमासाठी अधिक संख्येने उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे, त्याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. रस्त्यांवर पोलिसांचे चेक पोस्ट हटवावे म्हणजे वाहतूक संथ होणार नाही व गर्दी टळेल, अशी मागणी यावेळी उद्योजकांनी केली.
(CM Uddhav Thackeray discussion with Industrialist)