मुंबई | 28 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत होती. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये एकत्रितपणे सामोरं जाईल, असं सांगितलं. याशिवाय त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.
“15 ऑगस्टनंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात इंडियाची बैठक मुंबईत होऊ घातलेली आहे. या बैठकीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो. या बैठकीसाठी पूर्वतयारीबाबत आम्ही चर्चा केली. शरद पवार यांनी याआधी झालेल्या बैठकांविषयी त्यांचा अनुभव सांगितला. इंडियाची तिसरी बैठक आता महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत होणार आहे. शरद पवार यांनी या बैठकीचं नियोजन व्यवस्थित कसं करता येईल याबाबतचं मार्गदर्शन केलं”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
“शरद पवार हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. पुढच्या शनिवारी अकरा वाजता पुन्हा पुढच्या तयारीसाठी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री विविध पक्षांचे नेते असे 100 पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण नेते मुंबईला येतील असा अंदाज आहे. त्यामुळे एक चांगली बैठक व्हावी या पूर्वतयारीसाठी बैठक घेतली”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
यावेळी नाना पटोले यांना विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “विधी मंडळाची व्यवस्था असते, त्यामध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार विरोधात जास्त, त्याच पक्षाचा आमदार विरोधील पक्षनेता होता. काँग्रेस पक्षाचाच आमदार विरोधी पक्षनेता होणार आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.
“१५ ऑगस्टनंतर दौरे सुरु होतील. आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांचे दौरे रद्द केले आहेत. 15 ऑगस्टनंतर शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचेही दौरे सुरु होतील. त्यामुळे महाविकास आघाडी ही ताकदीने जनतेच्या समोर महाराष्ट्रात जाईल”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
“आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाईल हे आम्ही आधीच सांगितलं आहे. निवडणुकीला अजून वेळ आहे. काँग्रेस पक्षाने याबाबत चार-पाच बैठका घेतल्या आहेत. आम्ही काही सर्व्हे घेतले आहेत. लोकसभेत ज्या पक्षाचे उमेदवार मजबूत असतील त्यांना सगळ्यांनी ताकद द्यायचा अशाप्रकारचा निर्णय होईल. त्याच पद्धतीची तयारी सुरु आहे”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.