मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्यांच्या उपस्थितीत मुंबईत आज महत्त्वाची बैठकही पार पडली. या बैठकीत अनेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही, असा निर्धार शरद पवारांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणारे केवळ ईडी, सीबीआयच्या भीतीने जाणारे लोक आहेत, असंही शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीतीली इनसाईड स्टोरी समोर आलीय. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणं टाळलं पाहिजे”, असं मत काही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मांडलं. “पण टीका केली नाही तर आपण सोबत आहोत हा मेसेज जाईल”, अशी समज वरिष्ठांकडून या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचं मत पाहता अजित पवार यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयानंतरही पक्षात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असं चित्र दिसत आहे.
बारामतीची लढाई ही बारामती विरुद्ध दिल्ली अशी आहे. या लढाईसाठी सज्ज राहण्याची सूचना या बैठकीत देण्यात आली. या सूचनेनंतर सुप्रिया सुळे यांच्यासाठी काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान, लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं. “अजित पवार गटातील 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज लोकसभा निवडणुकांसाठी आढावा बैठक घेण्यात आली. कोल्हापूर, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमधील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. उद्या उर्वरित जिल्ह्यांचा आढावा घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत चांगली परिस्थिती आहे. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळी नावे आली आहेत. अनेक जण इच्छुक आहेत. चर्चा करून निर्णय घेतला जाईल”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
“फुटून गेलेल्या आमदारांपैकी अनेक जण संपर्कात आहे. परत घ्यायचं की नाही, त्याबाबत पवार साहेब निर्णय घेतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. अनेक पक्ष महाविकास आघाडीत येऊ इच्छितात. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन चर्चा करू आणि जागा वाटपाचा निर्णय घेऊ”, असं जयंत पाटील म्हणाले.