मुंबई : दादर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम ५० टक्के झालंय. पक्षाची कोणतीही मागणी नाही. बाळासाहेबांचं स्मारक हे जनतेचं स्मारक आहे. जनतेतंच राहणार आहे. त्याच्या मॅनेजिंग कमिटीत कोण आहे. कोण नाही याच्याशी काही देणंघेणं नाही. हे स्मारक तयार करण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना कायदा करून ही जागा हँडओव्हर केली होती.
एमएमआरडीएतनं त्यावेळी आम्ही मान्यता दिली. एमएमआरडीतनं काम होईल, हे सांगितलं. त्याला निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर त्या विभागाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडं आली. त्यांनी त्याला निधी उपलब्ध करून देऊन कामाला गती दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. शिंदे हे मुख्यमंत्री असतानाचं या स्मारकाचं काम पूर्ण होणाराय. आम्हाला स्मारकाचं काम पूर्ण होऊन ते जनतेला समर्पित करण्यात रस आहे. त्या समितीत कोण आहे, त्यात आम्हाला काही रस नाही, असंही फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लोकांना समर्पित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मी, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री पाहणी करायला आलो आहोत. पहिल्या टप्प्यात सिव्हिल वर्क ५० टक्केपेक्षा जास्त झाले. दुसऱ्या टप्प्याच्या आवश्यक बाबींची तयार सुरू आहे. लवकरात लवकर दुसरा टप्पा सुरू होईल. लाखो लोकांना प्रेरणा देणारा हा प्रकल्प आहे. जनतेला समर्पित करण्याचं आमचं काम आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.