पुणे : पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश (Krishnaprakash) बदलीवर नाराज असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. त्यांची इन्स्टावरची पोस्ट (Insta post) सध्या चर्चेत आहे. मेरे पसीने से मेरे मेहनत की खुशबू आती है, मेरा लहू मेरे रगों में ईमान का रंग भरता है। ऐ दौर की दुश्वारियां यूँ न इतरा मेरे हालात पे, वक्त तो वक्त है, आता और जाता है। अशी शायरी त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्या बदलीचा संदर्भ येथे लावला जात आहे. बदलीवर ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचीही गोविंदबागेतील निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. ही भेट वैयक्तिक होती, असे जरी कृष्ण प्रकाश सांगत असले तरी चर्चांना मात्र उधाण आले होते. आता पुन्हा त्यांनी इन्स्टा पोस्ट करत चर्चा अधिकच वाढवली आहे.
कृष्णप्रकाश यांच्या बदलीनंतर अंकुश शिंदे यांनी पदभारही स्वीकारला. त्यानंतर कृष्णप्रकाश काहीसे नाराज असल्याचे बोलले जात होते. कृष्णप्रकाश यांना या बदलीबाबत कोणतीही माहिती नव्हती, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण बदली झाली तेव्हा ते परदेशात होते. या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर नंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आता इन्स्टा पोस्ट करत पुन्हा एकदा नाराज असल्याचेच दिसत आहे.
20 एप्रिलला वरिष्ठ पोलिसी अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली. मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आयपीएस कृष्ण प्रकाश यांना विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही. आय. पी. सुरक्षा, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे धडेबाज पोलीस आयुक्त, आयर्नमन अशी आयपीएस कृष्ण प्रकाश ओळखले जातात.