मुंबई- एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता ते शिवसेना (Shivsena)या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा करण्याच्या तयारीत आहेत. मात्र हे सहजासहजी होण्यासारखे नाही, अशी प्रतिक्रिया कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांनी दिली आहे. आपल्या देशात पक्षचिन्हावर दावा करण्याच्या खूप कमी घटना घडल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) काळात हे घडले होते, मात्र त्यासाठी पक्षात उभी फूट पडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना या पक्षाने गटनेता म्हणून मान्यता दिलेली नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना मान्यता दिली नाही. त्यापूर्वी त्यांना गट म्हणूनही मान्यता नव्हती. असेही सरोदे यांनी सांगतिले आहे. एकनाथ शिंदे हेही स्वताला शिवसेना असल्याचेच सांगत आहेत. त्यामुळे हा प्रश्न अत्यंत कायदेशीर क्लिष्ट असल्याचे दिसते आहे. असे त्यांनी सांगितले.
उभी फूट म्हणजे पूर्ण पक्ष दुभंग फुटणे. पक्षाची जी व्याख्या केली आहे दहाव्या शेड्युलनुसार त्यानुसार दोन भाग आहेत. विधिमंडळातील पक्ष आणि मुख्य पक्ष हे त्याचे दोन भाग आहेत. जे निवडून आलेले आहेत, त्यांच्यापैकी दोन तृतियांश फुटले तर त्यांचे मत महत्त्वाचे मानण्यात येतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधिमंडळातील जास्त आमदार गेले आहेत. त्यांनी बंडखोरी केली आहे. मूळची संघटना शिवसेना याचे प्रमुख मात्र अजूनही उद्धव ठाकरे आहेत. विधिमंडळ पक्षाची नोंदणी कुठेही नसते. तर पक्ष संघटना, त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाकडे असते. त्यामुळे पक्षात फूट पडली का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळेच तालुका, जिल्हा ते वरिष्ठ पातळीपर्यंत पदाधिकाऱ्यांचा कुणाला पाठिंबा आहे, असे ठराव ते करतात का, तसे होत नाही तोपर्यंत, तिथे उभी फूट मानता येणार नाही. त्यामुळे पक्षचिन्हावर दावा करणे एकनाथ शिंदेंना शक्य नाही. ते कायद्याच्या दृष्टीने कठीण आणि दुरापास्त आहे. असेही मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
ठाण्यात नगरसेवक फुटले, ते दोन तृतियांश आहेत, मात्र ठाण्याच्या पातळीवर जे झाले ते चित्र राज्यात नाही. राज्यात बंडखरीनंतर आंदोलने झाली होती. ते उद्धव यांच्यासोबत आहेत, असेच त्यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्रीपद मिळेपर्यंत शिंदेंनी ते शिवसेनेत असल्याचेच सांगितले आहे. त्यामुळे पक्ष दुभंगला असे म्हणता येत नाही. पक्ष चिन्हावर दावा करता येणार नाही. असे सरोदेंनी स्पष्ट केले आहे.
पक्ष संघटना फुटली तर ती दोन-तृतियांश आहे का, हे मोजता येत नाही. त्यामुळे तालुका, ग्रामपंचायत, शिवसेना शाखा आहेत, त्यांच्या ठराव आणि कॉपी आल्या पाहिजेत. प्रतिज्ञापत्र यायला हवेत. तरच ते शिवसेना ठरु शकतात., चिन्हावर दावा करु शकतात. पण ती अवघड प्रक्रिया आहे. असेही सरोदे म्हणालेत.