मुंबई: मुंबईतील क्रुझवरील पार्टीला पालकमंत्री अस्लम शेख आणि राजकारण्यांची मुलं गेली असती तर उडता पंजाब नंतर उलटा महाराष्ट्र करण्याचा गेम होता, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आत नवे गौप्यस्फोट केले. मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टीला पालक मंत्री अस्लम शेख यांनाही बोलावण्यात आलं होतं. काशिफ खान यांनी अस्लम शेख यांना पार्टीला येण्यासाठी फोर्स केला होता. तसेच काही राजकारण्यांच्या मुलांनाही पार्टीला येण्यासाठी ट्रॅप केलं जात होतं. मात्र, हे लोक गेले नाहीत. अस्लम शेख आणि राजकारण्यांची मुलं या पार्टीला गेले असते तर उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र करण्याचा गेम होता हे सत्य आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला.
या पार्टीला अस्लम शेख यांना काशिफ खान का घेऊन जाणार होता? मंत्र्यांच्या मुलांना का ट्रॅप करत होता? कट रचून ड्रग्जचा खेळ सरकार चालवत आहे अशी बदनामी करण्याचा हा डाव होता, असा दावा करतानाच अस्लम शेखही हे सुद्धा या प्रकरणाची माहिती देतीलच. आता या प्रकरणाची मुंबईच्या एसआयटीनेही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हे मोठं प्रकरण आहे. त्यात पडू नये म्हणजे? एक नागरीक म्हणून सत्य बाहेर आणणं ही माझी जबाबदारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
कोणत्याही नेत्यावर आम्ही आरोप करत नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील ही लढाई नाही. तर एनसीबीत जी चांडाळ चौकडी बसली आहे त्यांना एक्सपोज करत आहोत. या चांडाळ चौकडीला बाहेर ठेवा, त्यांच्यामुळे डिपार्टमेंटची बदनामी होत आहे. यांची चौकशी करा. लॉजिकल एंडपर्यंत प्रकरण न्या, अशी आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे. तुमची बदनामी करू नका. देशाला नशामुक्त करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं आवाहन त्यांनी केलं. ड्रग्जची साफसफाई झाली पाहिजे. पण ही चांडाळ चौकडी राहिली तर साफसफाई होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
वानखेडेची आर्मी ड्रग्ज वसुली करणाऱ्यांकडूनही पैसे उकळत आहे. वानखेडेंनी या शहराला पाताल लोक केलं आहे. मी एनसीबीविरोधात लढत नाही. मी भाजपविरोधातील लढाई नाही. मी चुकीच्या लोकांविरोधात लढत आहे. या शहरात ड्रग्जच्या नावावर हजारो कोटींची वसुली होत आहे. निरपराध मुलांना फसवलं जात आहे. नशेचा कारोबार चालत आहे. लोकांना टार्गेट करून वसुली सुरू आहे. त्याविरोधात माझा लढा आहे, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप
व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा
(it would have been Udta Maharashtra after Udta Punjab: NCP leader Nawab Malik)