त्यांना म्हटलं तुम्ही तर माझ्या मर्डरची तयारीच केलीय; जावेद अख्तर यांनी सांगितलेला किस्सा काय?

| Updated on: Nov 09, 2023 | 8:12 PM

मनसे नेते राज ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्कात दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं. मनसेच्या या दीपोत्सवाचं हे 11 वं वर्ष आहे. प्रसिद्ध संवाद लेखक जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी या दीपोत्सवाचं आयोजन केलं. याप्रसंगी फिल्मी दुनियेतील असंख्य कलाकार उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुख यांनी सलीम-जावेद यांची मुलाखत घेतली. दोघांनीही विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.

त्यांना म्हटलं तुम्ही तर माझ्या मर्डरची तयारीच केलीय; जावेद अख्तर यांनी सांगितलेला किस्सा काय?
Javed Akhtar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : स्वदेसच्या शुटिंगला आम्ही गेलो होतो. त्यावेळी मला एक गाणं लिहायला सांगितलं. उद्याच हे गाणं हवंय आणि उद्याच या गाण्याचं शुटिंग करायचंही सांगितलं. मला साधारण गाणं लिहायला दीड तास लागतात. त्यामुळे मी होकार दिला. पण मला रामायणाच्या एका प्रसंगावर गाणं लिहायला सांगितल्याने मी गर्भगळीत झालो. मी तसा नास्तिक त्यामुळे काय लिहू असा प्रश्न पडला आणि मी दिग्दर्शकाला म्हणालो तुम्ही तर माझ्या मर्डरचीच पुरेपूर तयारी केलीय, असं उद्गार प्रसिद्ध संवाद लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी काढलं. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्कात दीपोत्सवाचा सोहळा आयोजित केला होता. यावेळी जावेद अख्तर बोलत होते.

आम्हाला मानसन्मान दिला त्याबद्दल राज ठाकरेंचं आभार मानलं पाहिजे. काही गोष्टी स्पष्ट बोलल्या पाहिजेत. उघड बोललं पाहिजे. तेव्हाच मजा येते. या मंचावर आम्हाला पाहून काही लोकांना आश्चर्य वाटलं असेल. राज ठाकरेंना सलीम-जावेदच्या शिवाय दुसरं कोणी मिळालं नाही का? असं अनेकांना वाटेल. स्वत:ला नास्तिक समजणारे जावेद अख्तर या मंचावर कसे असंही अनेकांना वाटलं असेल. कारण हा धार्मिक उत्सव आहे. पण त्याला दोन कारणं आहेत, असं जावेद अख्तर म्हणाले.

म्हणून मी आलो

मी इथे आलो त्याचं पहिलं कारण म्हणजे राज ठाकरे आमचे परममित्र आहेत. राज ठाकरेंनी शत्रूला जरी आमंत्रण दिलं तरी तो नकार तर देणार नाही ना? आम्ही तर मित्र आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे मी राम आणि सीता यांना हिंदूंचा वारसा समजत नाही. या देशातील प्रत्येक व्यक्तीची ती संपत्ती आहे. रामायण ही आपली सांस्कृतिक मालमत्ता आहे.

रामायण, महाभारत ज्याला माहीत नाही तो भारतीय कसा असेल? ही आपली संस्कृती आहे. आपली ओळख आहे. त्याच्याशी अनेकांची धार्मिक आस्था आहे. माझ्या सारख्या नास्तिकालाही ही अभिमानाची गोष्ट आहे. ज्या देशात राम आणि सीता आहे त्या देशाचा मी नागरिक आहे याचा मला गर्व आहे, असं जावेद अख्तर म्हणाले.

आणि मी उडालोच

यावेळी त्यांनी स्वदेस सिनेमाचा एक किस्साही सांगितला. स्वदेसमध्ये माझं एक गाणं आहे. मला एक मेसेज आला. उद्या महत्त्वाचं काम आहे. महाबळेश्वरला या असा हा मेसेज होता. मी तात्काळ महाबळेश्वरला गेलो. तिथे शुटिंग पाहत बसलो होतो. संध्याकाळी सर्व माझ्या खोलीत आले. एआर रहमान परदेशात जाणार आहे. मला उद्याच एक गाणं पाहिजे. या ठिकाणी मला शुटिंग करायचं आहे, असं मला सांगितलं गेलं.

मला गाणं लिहायला दीड तो दोन तास लागतात. त्यामुळे मी करेन म्हणालो. त्यांनी मला सिच्युएशन सांगितली आणि मी उडालोच. रामायणातील एक प्रसंग होता. मी म्हटलं माझ्या मर्डरची तुम्ही परफेक्ट अरेजमेंट केली. ही अस्थेची गोष्ट आहे. यात कोणी उलटसुलट गोष्ट करू शकत नाही. मला सांगितलं तुम्ही कराल, असं ते म्हणाले.

दोन तासात गाणं झालं

मी नेहमी रात्री 2 वाजता झोपतो. त्या दिवशी मी रात्री 9 वाजताच झोपलो. सकाळी उठलो तर पाहिलं माझ्यासमोर कागद आणि पेन होता. मी पहाटे 6 वाजता गाणं लिहायला बसलो. सकाळी 8 वाजता गाणं पूर्ण झालं. त्यांना आवडलं. सिनेमा आल्यानंतर एक पार्टी ठेवली. त्यावेळी अनेक विचारवंत आले होते. त्यातील एकाने गाण्याचं कौतुक केलं. रामचरित मानसमधील तत्त्वज्ञान जसंच्या तसं गाण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मलाही हे ऐकून आश्चर्य वाटलं. कदाचित माझ्यावर लहानपणी जे संस्कार झाले, त्यातून हे गाणं आलं असावं, असंही त्यांनी सांगितलं.