मुंबई : निरा देवघर प्रकल्पातील पात्र प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (11 जून) दिले. धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांबाबत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी याबाबत सविस्तर चर्चा करून जयंत पाटील यांनी हे निर्देश दिलेत (Jayant Patil direct to action on land distribution of Nira devghar project affected people).
धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांवर विधानभवनात आयोजित बैठकीत जयंत पाटील म्हणाले, “प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनींच्या बदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यास आपण बांधिल असतो. तो त्यांचा हक्कही आहे. त्यामुळे निरा देवघर प्रकल्पातील ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांना अद्याप जमिनी मिळाल्या नाहीत त्यांना त्या मिळतील यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ज्या अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर झाली असेल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी.”
“प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा शासनाच्या निर्देशाची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तातडीने कार्यवाही करून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे,” असं त्यांनी सांगितलं.
1999 पासून देवघर निरा प्रकल्पातील 300 हून अधिक प्रकल्पग्रस्तांना अद्याप आमच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या नाही. मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीस बोलावून त्यावर तोडगा काढून आम्हाला हक्काच्या जमिनी मिळवून देण्यासाठी सकारात्मक पाऊल उचललं. त्याबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकरी आनंदा डेरे, महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्था निरा देवघरचे सचिव प्रकाश साळेकर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर दिघे, संघटक संजय माने व लक्ष्मण पावगी यांनी राज्यसरकारचे आभार मानले आहेत.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Jayant Patil direct to action on land distribution of Nira devghar project affected people